पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आला. त्याला प्रसन्न, हलकंफुलकं आणि स्वैर स्वैर वाटत होतं! एका अनिवार लालसेनं त्यानं मद्याचे चार घोटही घेतले आणि सारं शरीर दरवळून आलं - फुलून आलं!
 एका अनिवार ओढीनं तो लीनाच्या राहुटीत आला. ड्रेसिंग टेबलासमोर उभी राहून ती काही तरी गुणगुणत आपले मोकळे केस विंचरीत होती. अंगात पारदर्शी गाऊन होता!
 एक लावण्यखनी सौंदर्य समोर वेधक हालचाली करत होतं, ते मादक तारुण्य त्याच्या डोळ्यात पसरलं!
 छोटू बेभान झाला होता.
 काय होतंय हे समजण्याआधीच त्याच्या गालावर सणसणीत चपराक बसली होती. त्याची मिठी झुगारून देत ती चवताळलेल्या नागिणीप्रमाणे फूत्कारत होती, “ही • ही तुझी हिंमत? स्वत:ला कधी आरशात पाहिलं आहेस? तीन फुटांचा एक सामान्य जोकर, माझी अभिलाषा बाळगतोस?- ही लीना एका उमद्या, उंच्यापुच्या तरुणासाठी आहे - तुझ्यासारख्या क्षुद्र जोकरासाठी नाही-!
 “क्षुद्र जोकर, तीन फूट उंचीचा बुटका जोकर- छोटूला वाटलं, आपला तोल जातोय! ही कुचेष्टा व ही तुच्छता... तो काही काळ आपले शारीरिक वैगुण्य व व्यंग विसरला होता. पण नाही, जगाच्या लेखी तो आजही जोकरच आहे. उपेक्षित, हास्यास्पद. त्याच्याकडे पाहून चार घटका करमणूक करून घ्यायची. बस! तो कसला कलावंत? तो तर माणूस म्हणूनही कुणाच्या जमेस नसतो. त्याचं विश्व खेळापुरत!
 लीनाचा तो गुरू होता. टॅपीझमध्ये तिला त्यानंच पारंगत बनवलं होतं. एके काळी तिचे विचार होते - 'जोकर का माणूस नसतो?' हे सारं बोलण्यापुरतं, वरवरचे येत होतं तर?
 सिनेमातला जोकर तिला हवाहवासा वाटला असेल, कारण तो वास्तवातला हँडसम राज कपूर होता.
 ठीक आहे, आपण तिचा प्रिय पुरुष होऊ शकणार नाही. ही शारीरिक उंचीची लक्ष्मणरेषा तिला पार करणं शक्य नसेल, पण तिच्या लेखी त्याच्या गुरुत्वाला, माणसालाही काही किंमत नसावी हे फारच घृणास्पद आहे.
 तिनं कधी विचार केला नसेल, पण मीही अखेर माणूस आहे. तीन फुटांचा असली तरी पुरुष आहे. मलाही वासना-भावना आहेत. मी भाळलो तिच्या वळसेदार शरीरावर. तिला ते पसंत नसेल तर नाही म्हणावं; पण अशी अवहेलना, अशी घृणा का? का म्हणून? तिच्या लेखी आपण माणूस नाही, केवळ सर्कशीतला बुटका जोकर आहोत?

 स्वप्नांचा बिलोरी आरसा फुटला होता. त्याचे तुकडे झाले होते. त्या तुकड्यांच्या

लक्षदीप । ४१