पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो कमालीचा पझेसिव्ह बनला होता.
 त्याच्या नकळत ती त्याच्या जीवनाचा एक हिस्सा बनली होती!
 मनाच्या साच्या भावना शरीरमाध्यमातूनच फुलून येतात, प्रकट होतात! याची छोटूला अवचित जाण आली व तो थरारून गेला. हा थरार त्याला रोमांचक वाटला - त्या थरारीत आपल्या जगण्याचा अर्थ आहे असं त्याला वाटलं!
 पुन्हा त्याला निमित्त होतं तो ग्रेट शोमन राज कपूर, त्यानं एकदा प्रयोग पाहिल्यानंतर सर्व कलाकारांना आपल्या फार्मवर पार्टी दिली होती व त्यावेळी ‘जोकर' हा सिनेमाही दाखवला होता. त्यावेळी लीना छोटूजवळ बसली होती. आणि त्याच्याशी सलगीने कुजबुजली होती -
 “जोकरचं दु:ख पाहून त्याचं सांत्वन करावसं वाटतं की, नको रे बाबा अशी टिपं गाळूस तू! तुझ्या आयुष्यातल्या सर्वच स्त्रिया बेवफा निघाल्या - तुला सोडून गेल्या - हे त्यांचं दुर्भाग्य! तू हिरा आहेस - त्यांना ते कळलच नाही!"
 “पण लीना - जोकर ही जगासाठी एक हसण्याची चीज आहे. त्याच्यावर कुणी स्त्री प्रेम करेल?"
 "का नाही करणार? जोकर का माणूस नाही? तो तर महान कलावंत आहे!"
 तिच्या त्या निकट स्पर्शानं व लागट बोलण्यानं छोटू मोहरून गेला होता!
 झपाटून गेला होता! पुन्हा पुन्हा त्याला तिची ती वाक्यं आठवायची - वाटायचं, ती काय सूचित करते आहे वा करू इच्छित आहे? हे - हे तिनं आपल्यासाठी तर म्हटलं नसेल? आपणही जोकर आहोत. शूटिंगच्या वेळी राज कपूर आपणास ‘कलावंत म्हणाला होता. आता लीनाही तेच म्हणते! तीही आपल्यातला कलावंत व माणूस पाहू शकते?- हाऊ नाईस!
 लीनाकडे पाहण्याची त्याची वृत्ती पार बदलली होती. एके काळी स्त्री त्याला आकाशीच्या चंद्राप्रमाणे अप्राप्य वाटत होती. पण लीनाच्या रूपाने ती हातावर प्राप्त आहे, फक्त पुढे होऊन हात धरायला पाहिजे, बस!
 पण हे हातभराचे अंतर बुटकेपणाच्या व्यंगाची व्यथा आयुष्यभर सहन करीत आलेल्या छोटूसाठी स्त्रियांच्या बाबतीत लक्ष्मण रेषा आहे हे त्याला काल जाणवलं. आणि एक लोभस स्वप्न भंग पावलं!
 कालची सकाळ-प्रसन्न कोवळी उबदार, सरावाच्या वेळी टॅपीजचा सराव करताना झालेले चुटपुटते पण ओढ लावणारे लीनाचे स्पर्श. ती केवढी जीवघेणी मादक हसत होती.

 छोट त्याच्या नकळत अंतराळी विहरत होता. शक्याशक्यतेचे, वास्तवतेचे भान केव्हाच सरले होते! डोळ्यात सोनेरी स्वप्नं तरळत होती. मनीमानसी लीना दाटून होती. तो वेडावला गेला होता. चाळवला गेला होता. सरावानंतर तो आपल्या राहुटीत

४० ॥ लक्षदीप