पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे रॅकेट त्यांनीच विकसित केलेलं होतं.
 “सर, तुम्ही इथे प्रांत असताना हा निवडा लिहिताना आम्ही टेन पर्सेटची ऑफर दिली होती, ती तुम्ही नाकारली, पण इतरांकडील प्रकरणात आम्ही समान ऑफर देऊन इथेच मोबदला वाढवून घेतलाच की! आणि तुम्ही दिलेल्या निवाड्यात अपील करून न्यायाधीशांकडून हवी तेवढी वाढ घेतलीच. नुकसान तुमचंच झालं! आता तुम्ही साक्षीला आहात, तरी आमच्या वकीलांच्या प्रश्नांना सूचक होकारार्थी उत्तर द्या. बस्, तुमच्यावर काही आळ येणार नाही. कारण निर्णय कोर्टाचा असेल. तुम्हाला या सेवेसाठी वाढीव मोबदल्याच्या वन पर्सेट देऊ. ती रक्कमही काही लाखापर्यंत आहे साहेब. विचार करा."
 मनोमन चंद्रकांत ताठरला होता. माजी नगराध्यक्षाला तो कसा आहे, हे का माहीत नाही? तरीही त्यांची हिंमत कशी होते? हा प्रश्न होता. म्हणजेच या मधल्या काळात, मागच्या पाच वर्षात पुलाखालून खूप काही पाणी वाहून गेलं आहे. इथलं रॅकेट जोरात चाललं आहे.
 चंद्रकांतनं अधिक माहिती काढून घ्यावी म्हणून काही प्रश्न विचारले, तेव्हा गिरगावकरांनी जो खुलासा केला, त्यामुळे तो चक्रावून गेला.
 त्या... न्यायाधीशांनी साक्षीमध्ये जर चंद्रकांतने अनुकूल उत्तरं दिली नाहीत तर जजमेंटमध्ये वाढीव मोबदल्याचं शाब्दिक कसरत करीत समर्थन करण्यासाठी दुपटीनं मागणी केली हेती. म्हणून ते दोघे चंद्रकांतकडे वन पर्सेटची ऑफर घेऊन आले होते!
 साक्षीच्या वेळी चंद्रकातनं निरीक्षण केलं होतं की, ते न्यायाधीश को-या चेह-यानं व निर्विकार नजरनं समोर भिंतीकडे पाहात आहेत. त्याला नजर देण्याचं टाळत आहेत. कारण तो प्रत्येक प्रश्नाची सविस्तर, सडेतोड, तरीही न्यायालयाची बेअदबी होऊ नये म्हणून नम्र भाषेत उत्तरे देत होता.
 जेव्हा त्याची खात्री पटली की, न्यायाधीशही मॅनेज झाले आहेत, तेव्हा त्यानं त्याच्या मते ठेवणीतलं ब्रह्मास्त्र काढलं!
 “युवर ऑनर, माझी विनंती राहील, मी जे साक्षीत सत्य प्रतिज्ञेवर सांगितले आहे, त्याची आपण समक्ष स्थळ पाहणी करावी. म्हणजे आपणास सत्य समजून येईल."
 त्या न्यायाधीशांनी जेव्हा चंद्रकांतची ही मागणी मान्य केली, तेव्हा वाटलं, आपण अखेरीस जिंकलो, स्थळ पाहणी केल्यानंतर आपल्या निवाड्याची, दिलेल्या किमतीची त्यांना खात्री पटेल आणि वाढीव मोबदला जमीनदारांना मिळणार नाही.

 पण आज दीड वर्षांनी अपिलाचा निर्णय घेण्यासाठी बैठकीत ती संचिका चाळताना चंद्रकांतला वाटलं, आपण फसवले गेले आहोत. त्याच्या समवेत न्यायाधीशांनी पाहणी केली खरी, पण स्थळ निरीक्षणात त्यांनी चक्क चुकीच्या नोंदी केल्या आहेत आणि जमिनीला एकरी दहा हजार रुपयाऐवजी अकृषित दर लावून चक्क सव्वा

लक्षदीप ■ ३४९