पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाखापेक्षा जास्त दर दिला आहे. त्यामुळे शासनाला सुमारे पाऊण कोटींचा फटका बसणार आहे.
 त्यासाठी पुन्हा अपील होऊ नये म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनावर, पाटलावर दबाव तर आणला आहे, पण मॅडमलाही ते भेटले आहेत. त्यांना राजकारण्यांची प्रचंड भीती वाटते, हे चंद्रकातला माहीत आहे, प्रामाणिक व स्वच्छ असूनही अशा वेळी त्या मनाविरुद्ध निर्णय घेतात, हेही चंद्रकांतने अनुभवलं आहे.
 तरीही आज चंद्रकांतनं त्यांना स्वानुभवानं त्या प्रकरणातले काळेबेरे सांगताच मॅडम त्याच्याशी अपिलाबाबत सहमत झाल्या. त्याचं एक कारण म्हणजे त्या न्यायाधीशांची अपकीर्ती. मॅडम त्याबाबत दोन तीन वेळा गंभीर होत बोलल्या होत्या, " ‘न्याय विकत मिळतो' ही नागरिकांची भावना होणं भयावह आहे.कायद्याच्या राज्याला मग काय अर्थ उरतो? त्यासाठी असे न्यायमूर्ती जबाबदार आहेत, आपल्या वर्तणूक आणि भ्रष्टाचारानं त्याला ते खतपाणी घालतात. मला ही फार चिंतेची बाब वाटते."
 त्या माजी नगराध्यक्ष व वकीलांच्या जोडीनं चंद्रकांतला समजवण्यासाठी यावेळी वेगळा मार्ग चोखाळला होता. यापूर्वी चंद्रकांत जिथं निवासी उपजिल्हाधिकारी होता, तेथील एका जुन्या सत्त्वशील लोकनेत्याला चंद्रकांत मानायचा, एका बड्या लोकप्रतिनिधींमार्फत गाठून त्यांनी चंद्रकांतला सांगावं असं विनवलं होतं. ते लोकनेते त्याला स्वच्छपणे कबुली देत म्हणाले, “मी त्यांचा शब्द टाळू शकत नाही. तुम्ही शक्य तेवढी मदत करा, एवढंच मी म्हणेन.”
 “साहेब, कधी नव्हे तो तुम्ही माझ्याजवळ शब्द टाकला आहे, पण हे प्रकारण मला पूर्ण माहीत आहे. मला वाटत नाही, मला त्यांना जी मदत हवी आहे ती करता येईल. तरीही तुमचा मान राहावा म्हणून त्यांना भेटेन आणि पाहीन काय करता येईल ते!"
 चंद्रकांतनं मनात प्रचंड चीड असली तरी शांतपणे माजी नगरध्यक्षाचं ऐकून घेतलं. त्यांचं तेच म्हणणं आजही होतं. फक्त ऑफरची रक्कम दामदुप्पट केली होती! त्यानं एवढंच सांगितलं.
 “मी अजूनही तसाच आहे, ही ऑफर मी ठोकरतो. पण उच्च न्यायालयाचे तुमच्या शहरातील इतर न्यायनिवाड्यातील ऑब्झव्हेंशन पाहतो आणि पुन्हा एकवार प्रकरण तपासतो."
 त्याचा हा संयम व शांतपणा केवळ त्या सत्शील लोकनेत्यांसाठी होता, ज्यांचा प्रामाणिकपणा आजच्या राजकीय जीवनात ब-याच अंशी अस्ताला गेलेला होता.

 उपसचिव, विधी व न्याय उपायुक्त व पुनवर्सन व भूसंपादन आणि जिल्ह्याचे संबंधित भूसंपादन अधिका-यांची एक समिती असते. जमिनीचा वाढीव मोबदला

३५० ■ लक्षदीप