पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येण्याचा त्याने विक्रम केला. त्यासाठी त्याने अभिनव अशी ‘पुतळा स्टॅटेजी' वापरली. तो स्वत: मराठा. ती मते पक्की होती. विरोधी उमेदवार मागासवर्गीयात लोकप्रिय होता. त्यावर मात करण्यासाठी त्याने एक अफलातून उपाय शोधला. मतदारसंघात मातंग व दलितांची मते बरीच होती, त्यांना आपलंसं करण्यासाठी त्याने चक्क ठोक भावाने अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाचपन्नास अर्धपुतळे बनवून घेतले आणि प्रत्येक गावात त्यांच्या वस्तीत जाऊन ते पुतळे भेट दिले. पुतळे देताना आश्वासन दिले, “मी निवडून आल्यावर चौथरा, भोवताली बगीचा व बांधकामासाठी आमदार फंडातून मदत करीन. तोवर तुम्ही कच्चा चौथरा उभारा व पुतळा बसवा.”
 त्याची ही ‘पुतळा स्टॅटेजी’ यशस्वी ठरली व तो भरघोस मताने निवडून आला.
 गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र महोत्सव, आंबेडकर जयंती व आता वाढीस लागलेली अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव हे अनेक दिवस चालतात. महसूल व पोलीस प्रशासन वर्षातून किमान चार महिने तरी अशा महोत्सवाच्या बंदोबस्तात गुंतून पडलेले असतात. त्यासाठी समाजाला अप्रत्यक्षपणे फार मोठी किंमत मोजावी लागते.
 वाचकहो, शहरातील तो रस्ता पूर्ण झाल्यावर त्याचा समारंभही स्थानिक आमदारांच्या हस्ते थाटात पार पडलाय, पण सुदैवानं त्या रस्त्याला कुणातरी देशभक्त पुढा-याचे वा गेला बाजार दिवंगत नगराध्यक्ष - नगरसेवकाचे नाव देण्याचे कुणाला सुचले नाही. समारंभानंतर आमदार प्रांजळपणे म्हणाले, “या रस्त्याला एकच नाव सार्थ राहील. “सर्वधर्मसमभाव रस्ता किंवा सेक्युलर रोड....! बरोबर ना?" त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला.
 चंद्रकांत मात्र त्यांच्या कथनातील सत्यदर्शनानं घायाळ होत त्यांच्याकडे टाळीला प्रतिसाद न देता सुन्नपणे पाहातच राहिला.

 वाचकहो, तुमचं काय मत आहे? त्या रोडला तुम्हीही 'सेक्युलर रोड' म्हणणार ना?

लक्षदीप ३३१