पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व पेठेचा संपर्क तुटतो. अरुंद रस्त्यामुळे एक मोठा ट्रक आला की तासन्तास वाहतुक कोंडी होते. त्यामुळे आपला हा आग्रह अनुचित आहे. मी तुम्हाला पर्याय देतो. हे मंदिर नगरपालिका कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या कड्यावर स्थलांतरित करू. हवं तर येथे तुम्ही छोटंसं मखर उभारून त्याला मंदिराचा आकार द्या. त्यासाठी मी मदत करीन, पण हे काम अडवणं योग्य होणार नाही."
 पण हिंदू समाजाची नेते मंडळी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे चर्चा वांझोटी ठरली.
 चंद्रकांत आपल्या कार्यालयात येऊन बसला. आणि विचार करू लागला. 'अशा परिस्थितीत आपले राजासाहेब असते तर त्यांनी काय केले असते? कोणती नवी प्रशासकीय गुरुकिल्ली त्यांनी चालविली असती?”
 चंद्रकांतनं स्वत:ला प्रश्न केला आणि ब-याच विचाराअंती त्याला उत्तर गवसत गेलं.
 त्या रात्री त्याने पोलीस बंदोबस्तात दोन्हीबाजूंनी रस्ते कामासाठी म्हणून बंद केल्याचे दर्शवीत कुणाला कळू न देता ते रस्त्यावरचे उघडे मंदिर हटविले. साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करीत ते नगर परिषद कार्यालयाच्या भिंतीबाहेरील कट्टयावर स्थलांतरित केले. त्यावर झटपट छोटे देवालय मखरासह बांधून काढले. या सा-याचं त्यानं आठवणीने व्हिडिओ शूटिंग करवून घेतले आणि एका पुजा-याच्या हस्ते पूजा घडवून आणली. याची शहरवासीयांना यत्किंचितही चाहूल त्या रात्री लागली नाही. मंदिर स्थलांतरित करून तो रस्त्याचा भाग, यापुढे जवळपास शंभर मीटर, रात्रीतूनच डांबरी करून टाकला.
 सकाळी शहरात हे वृत्त वा-यासारखे पसरले. विरोध करणारी हिंदू नेते मंडळी संतप्त झाली होती. त्यांनी शहर बंद ठेवण्याचे जाहीर केले. एक मोर्चा काढला. प्रशासनाचा निषेध करणारं निवेदन दिले. मंदिर पुन्हा रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक बेटासह उभारण्याचा पुनरुच्चार केला. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
 चंद्रकांतने शांतपणे ते शक्य नाही, असे सांगितले.
 तसा एक जहाल नेता आवेशाने म्हणाला,
 "बरोबर आहे साहेब. कु-हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना? तुम्ही हिंदूंच्या बाबतीत असं वागणारच. पण हाच न्याय तुम्ही मुस्लिमांना लावणार का? कसब्यात मुस्लिमांनी रस्त्याचा एक चतुर्थांश भाग व्यापून मशिदीचा विस्तार केला आहे. तो आपण पाडणार का?"
 "तेथेही हाच न्याय लावला जाईल."

 मोच्र्यातील हिंदूंचे त्या आश्वासनाने समाधान झाले नाही; पण त्याची बातमी मुस्लिमात हा हा म्हणता गेली.

३२८ । लक्षदीप