पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तो शुक्रवार होता. दुपारच्या नमाजानंतर मौलवींनी आवाहन केले. मशिदीचा रस्त्यात येणारा तथाकथित भाग प्रशासनानं पाडायला प्राणपणाने मुस्लिमांनी विरोध करावा. रात्रीतून मंदिर हलविले तसा प्रकार होऊ म्हणून चोवीस तास मशिदीचे रक्षण करण्यासाठी पहारा बसविण्याचे ठरविले.
 मराठवाडा हा एकेकाळी निजामाचा भाग होता. हैदराबादशी जवळचा संबंध आजही आहे. मार्गदर्शनासाठी येथील मुस्लीम समाज हैदराबादच्या मौलवीकडे व राजकीय नेत्यांकडे पाहात असतो. त्यांनी तातडीने शहरास भेट दिली आणि वातावरण तापत गेले.
 पंधरा दिवसांनी रस्त्याचे काम कसब्यात पोचले. चंद्रकांतने प्रथम एकशे चव्वेचाळीस कलम लावीत बाहेरच्या पुढा-यांना शहरबंदी केली. तापलेले वातावरण शांत करून शहरातील महत्त्वाच्या दोन्ही समाजांच्या नेत्यांची बैठक बोलावली.
 “हा रस्ता तुम्हा सर्व शहरवासीयांसाठी आहे. मशिदीच्या अनधिकृत विस्तारामुळे अडथळा निर्माण झालेला आहे. हा विस्तारित भाग मोकळाच आहे. तेथे कोणतेही धार्मिक कार्य होत नाही. हा भाग पाडला तरी मूळ मशिदीला व त्याच्या पावित्र्याला धक्का पोहोचत नाही. तरी तुम्ही विचार करावा. मी आवाहन करतो की, आपण स्वत:हून रस्त्यामध्ये असलेला भाग पाडावा."
 "ही आमच्या मजहबमध्ये ढवळाढवळ आहे, सर.”
 “हे पहा, हा धार्मिक प्रश्न नाही. रस्त्याच्या बांधकामाचा व त्यावरील अतिक्रमण दूर करण्याचा प्रश्न आहे. रस्ता होणारच हे लक्षात घ्या. रस्त्यामध्ये हिंदूचे मंदिर होते, ते मी स्वत: हटवले आहे. तुमच्या मशिदीचा केवळ एक कोपरा रस्त्यात येत आहे, तो फक्त मागे घ्यायचा आहे. इथे मशीद हटविण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा समजुतीनं घ्यावं, अशी इच्छा आहे. नाही तर प्रशासनाला कठोर व्हावं लागेल.”
 चंद्रकांतच्या बोलण्यात सडेतोडपणा कठोर निश्चय होता. हिंदूचे मंदिर लोकांना न जुमानता हलविल्याचे ताजे उदाहरण समोर असल्यामुळे चंद्रकांत जे बोलतो ते करून दाखवेल अशी मुस्लिमांची खात्री झाली होती.
 मुंबईत शिकून आलेला एक तरुण मुस्लीम नगरसेवक विचाराने डावीकडे झुकलेला होता. त्याने सर्वप्रथम ‘मशिदचा रस्त्यात येणारा भाग काढून घ्यायला काही हरकत नाही' अशी उघड भूमिका चर्चेच्यावेळी घेतली. मग मुस्लिमांनी बरीच चर्चा करून आपणहून मशिदीचा भाग पडू असं कळवलं. त्याप्रमाणे कृतीही केली.
 आठ दिवसात रस्ता रुंदीकरणासह आणि नदीवरील पुलासह पूर्ण झाला.

 त्या घटनेला पंधरा वर्षे झाली असतील आता, पण अजूनही शहरवासी चंद्रकांतला विसरले नाहीत. हा रस्ता त्याच्या पहिल्या पोस्टिंगमधला विजयाचा टप्पा ठरला. तोही हिंदू-मुस्लिमांच्या जातीय तणावाच्या सवेदनक्षम संदर्भातला.

लक्षदीप ॥ ३२९