पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो बनी-' मी समजू शकतो. सुपीक जमीन, जमीनदारी व दीर्घकाळ निजामी अमलामुळे आराम व निवांतपणा हा इथला स्थायीभाव आहे. त्यामुळे ही उक्ती एका मर्यादेपर्यंत सार्थ आहे. पण ‘जगात जर्मनी, भारतात परभणी'ची कारणमीमांसा लावता येत नाही. पण आज स्मरणरंजन करताना माझ्यापुरता अन्वयार्थ मी लावू शकतो. जगात कामासाठी जर्मनीसारखे अनेक युरोपीय देश, शहरे व अमेरिका सर्वोत्तम आहेत. मी तिथं गेलो नाही, की काम केलं नाही. मात्र महाराष्ट्रात मी जवळपास बारा शहरांत काम केलंय. कोल्हापूरचा अपवाद वगळता मला कामाचं पुरेपूर समाधान देणारं व माझ्या साहित्यिक-सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पाडणारं परभणी, माझ्यासाठी भारतातलं (किंवा गेला पक्षी, महाराष्ट्रातलं तरी) सर्वोत्तम गाव आहे.
 परभणीला मी सर्वाधिक म्हणजे साडेतीन वर्षे राहिलो. तिथं मी निवासी उपजिल्हाधिकारी (आर.डी.सी.) होतो. इथं माझी उपजिल्हाधिकारी श्रेणीतली कारकिर्द प्रौढ साक्षरता अभियानामुळे लखलखती, तर १९९५ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष पदामुळे साहित्यिक कारकिर्द सुरू झाली. एक साहित्यिक कार्यकर्ता व दोन राज्य पारितोषिक विजेत्या पुस्तकांमुळे तसेच 'इन्किलाब विरुद्ध जिहादाच्या लिखाणामुळे परभणी माझ्या साहित्यिक जीवनाचा एक मनोहारी व मनस्वी समाधान देणारा कालखंड ठरला, असं मला वाटतं.

 १९९३-९४ या वर्षात परभणी जिल्ह्याच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा मी प्रमुख समन्वयक होतो आणि अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील सुमारे सव्वादोन लाख प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर करण्याचे आव्हान होते. ते आम्ही यशस्वीपणे पेलले आणि ८५ टक्के प्रौढ, चांगल्या पद्धतीने लिहायला - वाचायला शिकले. पुण्याच्या कवें समाजविज्ञान संस्थेने इतर जिल्ह्यांत जसे पाच-दहा गावांत मूल्यमापन करतात तसे न करता, माझ्या आग्रहास्तव मूल्यमापनासाठी सुमारे दीडशे एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणले व तेवढ्याच म्हणजे दीडशे गावांची त्यांनी पाहणी करून चाचणी घेतली. ही गावे त्यांनी रँडम पद्धतीने निवडली होती; त्याचा हा निकाल होता. मी स्वतः आजही नम्रतेने, पण ठामपणे म्हणू शकतो की, परभणी जिल्ह्यातील साक्षरता - अभियान ख-या अर्थाने यशस्वी झाले. १९११ च्या जनगणनेत परभणी जिल्ह्यातील स्त्रियांची साक्षरता ही अवघी ३४-३५ टक्के होती, ती २००१ च्या जनगणनेच्या वेळी राष्ट्रीय सरासरी इतकी (म्हणजे ६४ टक्के) वाढली, हे केवळ १९९३-९४ च्या प्रौढ साक्षरता अभियानाचे यश म्हटले पाहिजे. त्यासाठी ते पूर्ण वर्ष मी झोकून देऊन काम केले. व्यवस्थापन कौशल्य व कार्यक्षमतेची कसोटी पाहणा-या या कामात मी यशस्वी झालो, ती जिद्द, कामाप्रती निष्ठा व ‘आउट ऑफ बॉक्स योजना व कार्यक्रमामुळे. मी आठवड्याचे तीन दिवस- सोमवार (बैठक व नियोजनासाठी), बुधवार (परभणी शहरासाठी) व शुक्रवार (प्रत्यक्ष साक्षरता वर्गाची पाहणी करणे व

३१४ । लक्षदीप