पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. परभणी व कोल्हापूरचे दिवस


 कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना मला अनेक वेळा करवीरनिवासी एक प्रश्न विचारायचे. “तुम्ही अनेक शहरात व जिल्ह्यात काम केलं आहे. तुम्हाला सर्वात कोणतं शहर / जिल्हा आवडला?" मी उत्तर द्यायचो, ‘परभणी'. प्रश्नकर्त्यांचे डोळे विस्मयाने विस्फारायचे. ज्या गृहस्थानं पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर व औरंगाबादसारख्या प्रगत शहरात काम केलं आहे, त्याचं आवडतं शहर परभणी म्हणजे भलतंच.. असा भाव त्या नजरेत असायचा. पुढे पुढे मी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणायचो, “अर्थात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर. पण त्यानंतर वा बरोबरीचे परभणी. त्यामुळे त्याचं थोडंसं समाधान जरूर व्हायचं. पण तरीही कलापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या जोडीनं हा परभणी कसं बसवतो हा प्रश्न त्यांच्यासाठी अनुत्तरित राहायचा.
 आता महाराष्ट्र शासनाचा सचिव म्हणून पदोन्नतीने, मुंबईमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झालो आहे. कोल्हापूर सोडून दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यांत मला पदोपदी जाणवतंय की, कोल्हापूर माझ्या मनात किती रुजलंय. माझ्या प्रशासकीय कामाचं आजवरचं शिखर म्हणजे माझी कोल्हापूरची जिल्हाधिकारी पदाची कारकिर्द. ‘पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलावो वैसा,' अशी माझी वृत्ती असल्यामुळे प्रत्येक शहरात व प्रत्येक पदावर काम करताना त्यात रंगून गेलो होतो. पण परभणी व कोल्हापूरमध्ये अंमळ जास्तच. परभणी सोडून जवळपास पंधरा-सोळा वर्षे झाली, तर कोल्हापूर सोडून दोनच महिने. पण माझ्या साहित्यिक, सांस्कृतिक व प्रशासकीय जीवनातले सोनेरी क्षण मला याच दोन शहरांनी दिले. ही दोन शहरं माझ्या अंतरंगात खोलवर रुजली आहेत व माझं आजचं व्यक्तिमत्त्व घडण्यामध्ये या दोन शहरांचा फार मोठा हात आहे. त्याचं नॉस्टेल्जिक स्मरण करीत, या दोन शहरांची ही माझी स्मरणचित्रे!

 ‘जगात जर्मनी, भारतात परभणी' ही म्हण परभणीत का रूढ झाली, त्यामागे काही इतिहास वा प्रसंग-घटना आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. पण परभणी म्हटलं की, “बनी तो बनी, नही तो परभणी' याच्या जोडीनं वरील म्हण प्रचलित आहे. ‘बनी

लक्षदीप । ३१३