पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अर्थात, लेखक होण्यासाठी उत्तम व अधाशी वाचक असणं ही पूर्वअट आहे. आईला वाचनाची आवड होती. तिला वाचनालयातून पुस्तकं आणून देण्याचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे पाचवी-सहावीपासून वाचनाची गोडी लागली. कुरुंदकरांच्या नांदेडात महाविद्यालयीन जीवन गेल्यामुळे वाचन चौफेर व मूलगामी होत गेलं. ललित साहित्याबरोबर समीक्षा, इतिहास, निबंध यांचंही वाचन होत गेलं. शाळेत असताना हिंदी भाषेच्या परीक्षा दिल्यामुळे व काही मित्रांमुळे हिंदी साहित्यविश्वाचं दालनहीं खुलं झालं, आणि मग अपरिहार्यपणे इंग्रजी साहित्याकडे वळलो. सांगायचं तात्पर्य काय, माझे वाचन, मी करिअरसाठी विज्ञान शाखेकडे गेलो तरी, साहित्याच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक समृद्ध व अद्ययावत् होतं, आजही आहे. मी साहित्यिक कसा आहे माहीत नाही, पण मी पट्टीचा वाचक आहे. अगदी प्रथम श्रेणीचा वाचक आहे, हे मी नि:संशयपणे सांगू शकतो.
 लेखनाची सुरुवात बालवयात बालवाङ्मयापासून (पहिल्या काही प्रकाशित कथांमधील एक कथा ‘साधना'च्या १९६५-६६ च्या दिवाळी अंकासाठी होती, असं आठवतं) झाली. मग सुहास शिरवळकर ज्या रहस्यकथा स्पर्धेतून पुढे आले, त्याच स्पर्धेत भाग घेऊन शंभर पानांच्या चार-सहा रहस्यकथा स्पर्धेतून १९७४-७५ साली लिहिल्या. त्यानंतर माझ्या लेखनाला नवे धुमारे फुटले. कथालेखन सुरू केलं. १९७० ते ८० च्या दशकातल्या तरुण - विद्यार्थी जीवनाचं (अर्थात मुंबई-पुणे ही। महानगरं सोडून जो अप्रगत महाराष्ट्र होता, त्या महाराष्ट्राच्या विद्यार्थी जीवनाचं) दर्शन त्यातून घडतं. 'कथांजली' व 'अंतरीच्या गूढ गर्मी मधील काही कथा आजही मला भावतात, त्या काळात घेऊन जातात आणि पुन:प्रत्ययाचा आनंद देतात.
 'वर्तमानकाळाच्या समस्या आणि माणसाचं जगणं रेखाटणारा साहित्यिक' अशी आज माझी जी ओळख आहे, त्याची सुरुवात माझ्या एका अप्रकाशित (जिची प्रत । हरवून गेली आहे) कादंबरीनं झाली. ती मी आणीबाणीनंतरच्या कालखंडावर लिहिली होती. एका मोठ्या प्रकाशकाला ती आवडलीही होती. पण काही कारणानं ती त्यांनी आश्वासन देऊनही छापली नाही. असो.
 माझी पहिली प्रकाशित लघुकादंबरी ‘सलोमी', माझं वेगळेपण अधोरेखित करणारी. रझिया पटेलच्या सिनेमाबंदी चळवळीच्या पाश्र्वभूमीवरील, परभणी-नांदेड भागातल्या एका सुशिक्षित मुस्लीम बंडखोर तरुणीच्या पराभवाची व वाताहतीची कहाणी म्हणजे 'सलोमी'; त्यातच ‘दौलत' नावाची दुसरी लघुकादंबरीही समाविष्ट आहे. मराठी दलित तरुण व निग्रो तरुणीची प्रेमकहाणी त्यात मी चितारली आहे. दोघेही आपापल्या समाजरचनेचे अनिवार्य बळी, पत्रमैत्री व प्रत्यक्ष भेटीतन ते एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात प्रेमभाव निर्माण होतो, त्याची ती कहाणी आहे.

 ‘सलोमी', अफगाणिस्तानातील दहशतवादाचा पर्दाफाश करणारी ९०० पृष्ठांची

२९८ । लक्षदीप