पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. झपाटलेपण ते जाणतेपण


 जरासं मागे वळून पाहताना असं वाटतं, की आज माझी जी ओळख आहे, माझं लेखक व प्रशासक म्हणून जे व्यक्तिमत्त्व आहे, त्याची जडणघडण काही प्रमाणात शाळकरी वयात व बरीचशी महाविद्यालयीन जीवनात झाली, मुख्य म्हणजे त्या काळातल्या विविध आंदोलनांच्या भारलेल्या वातावरणानं झाली! साठोत्तरी साहित्यानं, अधिक नेमकेपणानं सांगायचं तर, माणसाचं क्षुद्रत्व ताकदीनं दाखवणा-या 'कोसला', 'वासूनाका' अशा अतिवास्तववादी साहित्यानं आणि प्रस्थापित, पांढरपेशी, सदाशिवपेठी साहित्याला हादरा देणाच्या बंडखोर, दलित व स्त्रीवादी साहित्यामुळे माझं साहित्यिक भान आरपार बदलून गेलं. नक्षलवादी चळवळ, जे. पीं.चे नवनिर्माण आंदोलन, महाराष्ट्राच्या जनमनावर कायमचा ओरखडा उठविणारा ७२ सालचा दुष्काळ, आणीबाणीचे दिवस आणि तरुणाईच्या जल्लोषाची युक्रांद चळवळ हे सारं आमच्या तरुण पिढीचं आयुष्य ‘मनोहारी' करून गेलं.

 मूल्यांच्या घसरणीच्या, प्रस्थापितांच्या मोडतोडीच्या त्या कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक घडामोडी, होणारे बदल आणि संदर्भाचे ताणेबाणे मी सहजतेनं टिपत गेलो. स्वातंत्र्योत्तर काळातल्या पहिल्या दोन दशकांतली तरुणांची पिढी, (जी आदर्शानं भारलेली आणि नवनिर्माणासाठी आसुसलेली, मूल्यांवर विश्वास ठेवणारी होती) आणि आजची नव्वदीनंतरची पोस्ट मंडल, पोस्ट लिबरलायझेशनच्या काळातली तरुणांची पिढी (जी भोगवादी, सामाजिकदृष्ट्या काळजी वाटावी इतपत आत्मकेंद्री आणि प्रतिगामी झाली आहे.) यांच्या मधल्या तरुण पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. त्या काळाचा मी प्रॉडक्ट आहे, मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण या काळात मराठी साहित्यात प्रस्थापित मूल्यांची प्रचंड मोडतोड (भाऊ पाध्येसारख्या लेखकाच्या) महानगरीय संस्कृतीच्या साहित्यकृतीनं होत होती, तसंच दलित साहित्यातून विद्रोह, वेदना आणि माणुसकीच्या मूल्यांची पुनस्र्थापना होत होती. हा संक्रमणाचा व प्रचंड खळबळीचा कालखंड माझ्या साहित्यिक जडणघडणीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.

लक्षदीप । २९७