पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. हे स्वतंत्रते भगवती!


 ह स्वतंत्रते भगवती!
 तू अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता, तुला प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहिलं आणि ओठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्तोत्र आलं, म्हणून तुला ‘हे स्वतंत्रते भगवती' असं संबोधतोय!
 प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं, वाचलं होतं! व्हिडीओ व छायाचित्रं इंटरनेटवर पाहिली होती. पण कवि साहिर म्हणतो ते अगदी खरंय. ‘जो बात तुझमें हैं, तेरी तस्वीरमें नहीं?"
 न्यूयॉर्क शहराच्या हडसन नदीमधील ‘लिबर्टी' बेटावर तुझा वास आहे. बॅटरी पार्कवरून बोटीनं तुझ्या भेटीला यावं लागतं. स्वातंत्र्य हे मानवी जीवनाचं सर्वोत्तम मूल्य आहे. ते म्हणूनच सहजासही लाभत नाही म्हणतात. तसंच तुझं दर्शनही मला पहिल्या दिवशी उशीर झाल्यामुळे व लिबर्टी बेटावर मर्यादित प्रवेश असल्यामुळे झालं नाही. पण जवळच्या उपनगराला मोफत बोट सेवा होती तिच्यातून फिरून तुला दुरून प्रथम पाहिलं. आमच्या घराण्यात दुरून मंदिराच्या कळस दिसला की देवाची धूळभेट झाली असं म्हणतात. तशी तुझी धूळभेट झाली. खरं तर धुकं व अंधारलेलं आभाळ यामुळे तुझी तेज:पुंज हरित प्रतिमा काहीशी काजळलेली वाटली. तो २००४ चा जॉर्ज बुशचा राष्ट्राध्यक्षपदाच्या दुस-या टर्मच्या निवडणुकीचा काळ होता. आजचा बराक ओबामा तेव्हा जगाला अज्ञात होता. पण तुझं काजळलेलं रूप मनात दाटून राहिलं हे मात्र खरं!

 दुस-या दिवशी प्रसन्न होऊन आम्हास, तू भगवती, दर्शन दिलंस. स्वच्छ उन्हें व निळे-नितळ आभाळ होतं आणि त्या दीप्तीमय वातावरणात तू नुसती झळाळत होतीस. तुला पाहताना नजर स्तिमित होत होती. मन उचंबळून येतं होतं! एका विशाल लोकशाही देशाचा मी नागरिक, दुस-या एका मोठ्या लोकशाहीवादी देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेली तुझी १५१ फूट शुद्ध तांब्यात घडवलेली सुबक व प्रतीकात्मक मूती पाहताना आम्हा हिंदूंच्या कोणत्याही पूजनीय देवतेपेक्षा अधिक पवित्र व आश्वासक

२९२ । लक्षदीप