पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटत होतीस.
 ज्या फ्रेडरिक ऑगस्ट वॉल्डी या शिल्पकारानं तुझी मूर्ती घडवली, त्याला दमनाच्या शृंखलेतून मुक्त झालेली मानवता स्त्री प्रतिमेतून दाखवायची होती, जी त्यानं तुझ्या पायाशी असलेल्या मुक्त साखळ्यातून शिल्पबद्ध केली. तुझ्या उंचावलेल्या उजव्या हातातली जळती मशाल स्वातंत्र्याचं अखंड तेवणारं प्रतीक आहे. तुझ्या मुकुटातील सात किरणे हे सप्तसमुद्र आणि सप्तखंड अधोरेखित करून तू केवळ अमेरिकेची नव्हे तर जगाची स्वतंत्रदेवता आहेस, हेच शिल्पकाराला समस्त नागरिकांच्या मनावर बिंबवायचं होतं!
 हे स्वतंत्रते भगवती! तुझी अमेरिका हा जगाचा ‘मेल्टिंग पॉट' आहे, तिथं पृथ्वीतलावरील कुठल्याही रंग, धर्म व संस्कृतीचा माणूस गुणवत्ता व परिश्रमाच्या जोरावर मोठा प्रतिष्ठित होतो. जगातील अनेक रोगट देशांना आपल्या रक्तशुद्धतेचा व निर्भेळतेचा विकृत अभिमान आहे, पण तुझ्यामुळे अमेरिका त्यापासून कोसो दूर आहे. उलट तिला संकरतेचा व अभिसरणाचा अभिमान आहे. ‘म्युटेशन' व 'इव्होल्युशन' या दोन क्रियांमधून भिन्न तत्त्वे एकरूप होतात, एकमेकात मिसळून जातात आणि इतरांना कमी वा वेगळी लेखणारी वृत्ती गळून पडते, हाच मानवी स्वातंत्र्याचा सारांश व निष्कर्ष आहे. तो तुझा कृपाप्रसाद आहे.
 पण तरीही हे स्वातंत्र्यदेवते, मला तुझी पहिल्या दिवशीची धूसर काजळलेली प्रतिमा अबोध मनाला कुठेतरी भिडली होती त्याचा उलगडा मला नंतरच्या अमेरिकन प्रवासात झाला, जेव्हा मी अनेक काळी - कुपोषित - दरिद्री - निग्रो माणसं व त्यांचं भारतीय दलितांशी समांतर असं बहिष्कृत जीवन पाहिलं. एक वर्णभेदामुळे तर दुसरं रंगभेदामुळे समाजरचनेची बळी. त्या भेदाची काजळी तुझ्या रूपावर, तुझ्या मूर्तीवर तुझ्या अहंकारी श्वेतवर्णीय अमेरिकन बालकांनी चढवली होती. तुझ्या तेजाला कुठंतरी ग्रहण लागलं होतं!
 वास्तविक स्वातंत्र्य, समता व बंधुभावाचा उद्घोष करणा-या फ्रेंच जनतेची गुलामीची जुलमी प्रथा संपवणाच्या व नव्याने स्वतंत्र झालेल्या अमेरिकेला तुझा अप्रतिम पुतळा घडवून दिलेली अजोड व अनमोल भेट होती. त्यामुळेच तू जगाची स्वातंत्र्यदेवता बनली होतीस. पण भारतात जशी कायद्यानं अस्पृश्यता व जात जात नाही, अद्याप गेली नाही, तशीच तुझ्या देशात, हे भगवते, निग्रोंची मानहानी व गुलामी श्वेत अमेरिकन्सच्या मनातून, विचारातून कुठे गेली होती? म्हणून माझ्या संवेदनक्षम अबोध मनात तुझी काजळलेली प्रतिमा घर करून राहिली असावी.

 पण २००९ साली नवी पहाट झाली आहे. हे स्वातंत्र्यदेवते, मला खात्री आहे, आज पुन्हा मी तुला दाट धुक्यात व काजळलेल्या आभाळात पाहिलं तरी तुझं मूळ तेजस्वी रूपच दिसेल. ते आता कधीच काजळी धरणार नाही. कारण आता तुझा एक

लक्षदीप ॥ २९३