पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोलणं आठवलं. तो कन्याकुमारी व तीन सागरांचा संगम हेलिकॉप्टरनं पाहून आला होता. “मित्रा... या पदाचा ख-या अर्थानं आज फायदा झाला. हिंद महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या खाडीचा त्रिवेणी संगम, खडकावरील विवेकानंदांचा पुतळा आणि सूर्यास्त हेलिकॉप्टरमधून पाहिला.... आणि डोट धन्य झाले..."
 मी अजून कन्याकुमारीला गेलो नाही, पण मित्राच्या लकाकत्या डोळ्यातून जो अद्भुत आनंद ओसंडत होता, तो पाहून खरंच सांगतो, मला त्याचा हेवा वाटला होता त्या क्षणी...

 आणि आज अशा पद्धतीनं ‘दि ग्रेट लेक सिस्टीम' पाहाता येत नाही म्हणून जीव हळहळत होता. बलूननं वरून धबधबा पाहाणं शक्य होतं, पण पंधरा दिवसापासून तो तांत्रिक कारणास्तव बंद होता! असो. जे पाहिलं नाही, त्याबद्दल हळहळण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण जे पाहिलं, तेही अद्भुत स्वर्गलोकीचं लावण्य पाहिल्यासारखं होतं. ती तृप्ती, ते समाधान व तरीही पूर्णपणे ते नजरेत साठवून घेता येत नाही याची अतृप्ती मला नासवायची नव्हती. पण पंधरा दिवसातच मला कॅनडाच्या टोरंटो शहरात जाता आलं. तिचं सी. एन. या जगातील सर्वांत उंच टॉवरवरून लेक ओंटॅरिओचं सागरासारखं आकाशाला भिडलेलं पाणी व त्याची प्रचंडता पाहिली आणि अंशमात्रानं ‘दि ग्रेट लेक सिस्टीम' पाहिल्याचे समाधान वाटलं!

२८८ ॥ लक्षदीप