पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखात आहे. मानवी सेवाभावीवृत्तीला कृतज्ञतापूर्वक दिलेली भावांजली या ललित लेखात आहे.पर्यटक म्हणून या आश्रमाला दिलेल्या भेटीचा वृत्तांत आहे.तो कोरडा,रूक्ष स्वरूपाचा नाही.प्राण्यांविषयीच्या सहानुभावाने लिहिला गेलेला आहे.त्या आश्रमातील शिस्त,देखभाल पाहून लेखकाचे मन भरून येते.तो त्यांचा होऊन जातो.सोंडेतून लहान हत्तींना दूध पाजताना पाहून,त्यांच्या डोळ्यातील तृप्ती पाहून मातृत्वाची वात्सल्यमूर्ती लेखकाच्या डोळ्यासमोर झळकते.हिरव्याकंच वृक्षराजीच्या पार्श्वभूमीवरील चमकत्या सूर्यप्रकाशात खळाळणाच्या लाटेत एका वेळी साठ सत्तर हत्ती जलक्रीडा करताना पाहून निवेदकाच्या डोळ्यांचं पारणं फिटतं.अशी अनुभूती तीमध्ये आहे.आश्रमातील दिवसभराची अनाथ हत्तीची देखभाल पाहून निवेदकाला मानवी भूतदयेबद्दल व करुणेबद्दल कृतज्ञता वाटते.प्रवासातील एका अनोख्या ठिकाणाबद्दलची भावस्थिती व त्यावरचे भाष्य या लेखात आहे.
 ‘नायगारा-दि व्हाईस ऑफ गॉड' या लेखात अमेरिकेतील नायगारा या ठिकाणास भेट दिल्याचा वृत्तांत आहे.निसर्गाच्या अपूर्व आणि अद्भूत किमयेचे वर्णन आहे.या परिसराचा निवेदकाच्या मनावर जो ठसा उमटतो त्याचे हे निवेदन आहे.धबधबा,नदी व भवतालाचे काव्यात्म निवेदन आहे. जोडीने निवेदकाच्या मनातील कुतूहल,तौलनिक विचार यांचे प्रकटीकरण आहे.नायगाव्याच्या भव्यतेच्या व त्याच्या सौंदर्याच्या सूक्ष्म अशा नोंदी आहेत.गाईडने पुरविलेली माहिती आहे.तो परिसर पाहून निवेदकाला सर्वांगाला डोळे फुटल्याचा प्रत्यय येतो.संपृक्त भरलेपणाची प्रचिती येते.'मेड ऑफ दि मिस्ट' नावाच्या बोटीत बसल्यानंतर गाईडने सांगितलेल्या थंडर जमातीची चित्तवेधक मिथककथाही सांगितली आहे. सामूहिक श्रद्धामनाने जोपासलेल्या या कथेने या प्रवासकथनाला एक वेगळे रूप प्राप्त करून दिले आहे. देशमुख यांच्या ललितलेखनाचा एक वेगळा आविष्कार म्हणून या ललितलेखनाकडे पाहता येते. वेगवेगळ्या निमित्ताने त्यांचा जो प्रवास घडला त्याची स्मरणचित्रे या लेखनात आहेत.स्थलवैशिष्ट्ये व त्यांचा मनावर जो ठसा उमटला त्याचे प्रत्ययकारी वर्णन या लेखनात आहे.

 न्यूयॉर्क शहरातील हडसन नदीकाठी असणाच्या स्वातंत्र्य देवतेचे तेजस्वी शिल्प पाहिल्यानंतर निवेदकाच्या मनात जे विचार येतात ते स्वतंत्रते भगवती' या लेखात प्रकटले आहेत.एका अर्थाने या स्वातंत्र्य देवतेच्या शिल्पाशी केलेला हा संवाद आहे.स्वतंत्रता देवतेला उद्देशून व्यक्त केलेले हे मनोगत आहे.या तेजस्वी,पवित्र शिल्पासमोर नतमस्तक होताना निवेदकाच्या मनात तिचे काजळलेपणही लक्षात येते.जगातील वर्ण आणि रंगभेदाच्या भावनेने निवेदक चिंतेत आहे.मात्र २००४ साली बराक ओबामांच्या निवडीने हे काजळलेपण नाहीसे झाल्याची भावना आहे.तसेच अमेरिकेची विश्वात्मकता आणि समकाळातील तिचे दुटप्पी वागणे याबद्दलची खंतही व्यक्त केली आहे.

२० । लक्षदीप