पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होणार. मी नुकताच सौदा केला आहे. एका महिन्यात एक सागरी बोट दुरुस्त करून नव्या रूपात आपल्याला मिळणार आहे. चांगलं महिनाभर प्रशांत सागरात सफर करू. वादळवारे झेलीत, समुद्रधून ऐकत नवी अनोखी दुनिया पाहू. कदाचित त्यातून तुला लेखनाला नवे विषय मिळतील."
 पपांचे खारावलेले निळे डोळे नव्या अदम्य साहसाच्या कल्पनेनं चमकत होते. बेटा, जग किती अनोखं, सुंदर, व समृद्ध आहे. ते सर्वांगानं अनुभवणं हीच खरी जिंदगी आहे.."
 पपांचा हा वादळी वारसा माझ्या नसानसात भिनला होता. म्हणूनच मदरच्या पवित्र पण कंटाळवाण्या धार्मिक दुनियेत मी अस्वस्थ होतो. माझी घुमसट तिला समजत नव्हती. तिच्यासाठी चर्चच्या माध्यमातून मानवतेची व त्या द्वारे येशू ख्रिस्ताची सेवा हे जीवनाचं अंतिम ध्येय होतं. तिला स्वत:ला तरुणपणी नन् व्हायचं होतं. त्या माध्यमातून धार्मिक जीवन जगायचं होतं. पण तारुण्याच्या वादळी रक्तओढीनं ती पपांच्या प्रेमात पडली. जेव्हा ती त्यातून भानावर आली तेव्हा ती संसारी स्त्री झाली होती. तिच्याकडून मला जन्म दिला गेला होता. पपांच्या जंगली साहसाच्या दर्यावर्दी जीवनामध्ये आणि विशेषत्वानं त्यांच्या शिकारी जीवनामध्ये ती स्वत:ला 'मिसफिट समजत होती. दोघांचा सुसंवाद तुटत गेला. ती चर्चकड़े अधिकाधिक झुकत गेली. त्यातूनच मला धार्मिक शिक्षण देऊन चर्चच्या सेवेसाठी ‘फादर' बनवायचं, असं तिच्या मनानं घेतलं. त्यासाठी मला विचारावंसं तिला वाटलं नाही. मला तिनं गृहीत धरलं होतं. "मुलाला त्यात काय विचारायचं?" अशी तिची भूमिका होती. पपांनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली होती, “पवित्र कामासाठी का परवानगी घ्यावी लागते?” तिच्या दृष्टीनं हे योग्यच होतं. कारण चर्च व चर्चप्रणीत सेवाजीवन यापेक्षा जगण्यात अधिक काही असतं, हेच तिला मुळी मान्य नव्हतं. पपांवर नव्हाळीच्या वयात केलेलं वादळी, बेबंद प्रेम व विवाह हा तिच्यासाठी एक अपघात होता. त्यामुळे उर्वरित आयुष्य त्या पापांचे परिमार्जन करीत घालवायची तिची मनीषा होती. मला 'फादर' बनवण्यासाठी व्हॅटिकन सिटीला पाठवणं ही त्याचीच तर्कशुद्ध परिणती होती.
 झापडबंद धार्मिक जीवन जगणारी मदर मला ओळखू शकत नव्हती. पण पपा खरंच ग्रेट होते. त्यांची जीवनप्रेरणा हाच जीवनाबाबतची माझा दृष्टिकोन होता. म्हणून मदरचा हा निर्णय त्यांना मान्य नव्हता. त्यांनी कडाडून विरोध केला पण ती ठाम होती. मला त्या कोवळ्या वयात काही आवाज नव्हता.

 व्हॅटिकन सिटीच्या चर्चमधील कठोर, बंदिस्त व यमनियमांच्या दोरखंडानं करकचून बांधलेले जीवन, पपांच्या तालमीत तयार झालो असल्यामुळे माझ्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. अवघ्या एका महिन्यातच मी त्या जीवनाला कंटाळलो. त्या एका प्रसंगानं मला तिथून पळ काढण्याचा निर्णय घेणे भाग पडलं.

लक्षदीप ।। १८३