पान:लंकादर्शनम्.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५

वरील आकड्यावरून असे दिसून येईल की, सीलोनमधील नारळाची पैदास जगांतील एकंदर पैदाशीच्या एक नवमांशा इतकी आहे. फिलिपाईन बेटांतील ठेंगण्या जातीची लागवड सीलोनमध्ये बरीच केलेली दिसते.

 नारळाची मुळे जमीनींत ३ किंवा ४ फुटांपेक्षा जास्त जात नाहींत व एकेका झाडाला सुमारे सात हजार पर्यंत मुळे असतात म्हणून फिलीपाइन वेटांत नारळाच्या रायीं मधून नांगराने जमीन नांगरतात. सीलोन मध्ये नारळाच्या रायांतून नांगरण्याची चाल नाही.* खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण शेकडा ६५ ते ७० असते. इतर गळितांत तेलाचे प्रमाण फार कमी असते. नारळाची पैदास फार मोठी असल्यामुळे खोबरेल तयार करण्याचे सीलोनमध्ये ५०० चे वर कारखाने आहेत. खोबरे तयार करून परदेशी पाठविणे, काथ्याची दोरखंडे व इतर पदार्थ करणे हे येथील लोकांचे दुय्यम धंदे आहेत.

 सीलोन मधून खोबरे व तेल अल्पप्रमाणांत हिंदुस्थानांत येते. फ्रान्स् आणि जर्मनी येथे सीलोन मधून तेल व खोबरे फार जाते. खोबऱ्याचे तेल तिकडे काडलीव्हर व सिट्रोनेलातेल यांत मिसळतात. शिवाय त्या पासून लोणीही काढतात. हे लोणी गाईच्या किंवा म्हशीच्या लोण्यापेक्षा सरस असते कारण ते मुळीच नासत नाहीं. पाव व बिस्किटें करण्याच्या कामी हे लोणी पाश्चात्य देशांत वापरतात. शिवाय फ्रान्समध्ये हे लोणी सैनिकांना देण्यात येते यामुळे त्यास चांगला भाव येतो.

 हिंदुस्थानांत कोंकण, मलबार, बंगाल, मद्रास इलाख्याचा पूर्व किनारा व काठेवाड येथे नारळ होतो. गोदावरीच्या मुखाजवळील भागां-


* एरंडी ४६ ते ५०; तीळ ४५ ते ५०, भुइमूग ४४ ते ५० करडई ३० ते ३२, सरकी १६ ते १९