पान:लंकादर्शनम्.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

तला नारळ हिंदुस्थानांत सर्वांत उत्तम समजला जातो. हिंदुस्थानांत जरी बराच नारळ पिकतो तरी तो हिंदुस्थानास पुरेसा होत नाही. अन्दमान, सीलोन व विषुववृत्ताजवळील बेटे येथून तेल व नारळ यांची आयात होते. दरशनिवारीं शनीस नारळ फोडणारांनी नारळाचा फाजील उपयोग केल्याने परदेशी मालास आपण नकळत उत्तेजन देतो हे लक्षात ठेवावें.

चहा

 महाराष्ट्रांतील अगदी खेड्यापाड्यांतून चहाचा प्रसार झालेला आहे परन्तु चहा कोठे होतो, चहाचा व्यापार किती मोठा आहे, त्यांत हिंदी भांडवल व मजूर किती गुंतलेले आहेत याबद्दलची माहीती फारच थोड्यांस असते म्हणून येथे थोडीशी माहीती दिलेली आहे.

 पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी चिनी चहा विलायतेस नेऊन अतोनात फायदा मिळवीत असे. सन १७८७ मध्ये चिनी चहाची लागवड हिंदुस्थानांत करण्याची कल्पना निघाली पण सन १८३४ पर्यंत या कल्पनेला विशेषशी चालना मिळाली नाहीं. लार्ड वुइल्यम बेंटिंगने चीन मधून चहाचे बी व तज्ञ मजूर आणण्याकरितां तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात फारसे यश न येतां पुष्कळ पैसा मात्र खर्च झाला. तथापि १८५२ सालापर्यत हिंदुस्थानाने बरीच मजल मारून ८० लक्ष पौंड चहा परदेशी पाठविण्यास सुरवात केली.

 सन १८४० मध्ये दार्जिलिंग आणि चितगांव या जिल्ह्यांत प्रयोग दाखल प्रथमतः चहाची लागवड केली. त्यानंतर हिंदुस्थानांत चहाची लागवड एक सारखी वाढतच गेली. प्रस्तुत काली हिंदुस्थान व सीलोन येथे किती मळे आहेत ते पुढे दिले आहे.