पान:लंकादर्शनम्.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११२

 श्रीपाद येथे जाण्यास दोन मार्ग आहेत. एक रस्ता खालील नीच प्रदेशाकडून गेलेला आहे, परन्तु रस्ता अत्यंत अरुंद व चढाचा आहे. यात्रेकरू वर चढत असतांना पडू नयेत ह्मणून जागजागी रस्त्याच्या बाजूने लोखंडी सांखळ्या लाविलेल्या आहेत, दुसरा रस्ता हॅटनच्या बाजूने आहे. रस्ता चांगला आहे व हॅटनपासून अगदीं श्रीपादजवळ जाईपर्यंत त्याची लांबी १४ मैल आहे.

 शिखरावर पावलाच्या खुणेवर लहानसे देऊळ बांधलेले आहे. श्रीपाद हे एकच ठिकाण असे आहे की, जेथे भिन्नभिन्न धर्माचे लोक एकाचे उपास्याच्या उपासनेकरितां एकत्र जमतात. हिंदु लोकांची अशी कल्पना आहे की, श्रीपाद ही शिवाच्या पायाची खूण आहे. खिस्ति लोक असे ह्मणतात की, 'थामस' नांवाचा साधु प्राचीनकाळी हिंदुस्थानांत आला असतांना त्याच्या पावलाची खूण येथे उमटली आहे. मुसलमान लोक असे ह्मणतात की, अॅडॅम यांस स्वर्गातून बाहेर घालविल्यानंतर तो या ठिकाणी एका पायावर उभा राहून तपश्चर्या करीत होता, त्याच्या पायाची ही खूण आहे. बुद्धधर्मीयांचे मते हें बुद्धाचे पाऊल आहे.

 अशा भिन्नभिन्न समजुतीमुळे हिंदु, बुद्ध, मुसलमान खिस्ति अशा चारी धर्माचे लोक श्रीपादाच्या दर्शनाकरितां मोठ्या भक्तीने जात असतात, ७२६० फूट उंचीवर जाण्याचे काम सामान्य नव्हे. इतक्या उंचीवर थंडी फारच जोराची असते. कित्येकदां मध्येच पाऊसही येतो. यामुळें दुर्बल किंवा वृद्ध यात्रेकरू या प्रवासांतच प्राण सोडतात. अलीकडे हा प्रवास सुखकर करण्याकरितां पुष्कळच सोयी करण्यात आलेल्या आहेत.

 हे देऊळ बद्ध भिक्षूच्या ताब्यात आहे व तेथील व्यवस्था भिक्षुच पहातात, अशा प्रकारच्या पायाच्या खुणा पेगु, आवा व आराकान येथे आहेत सयाम येथे सुवण्णपब्बत ( सुवर्णपर्वत ) नांवाच्या पर्वतावर प्रसिद्ध असे श्रीपादस्थान आहे.