पान:लंकादर्शनम्.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१११

 कोलंबो पासून हे ठिकाण १३५ मैल आहे. रेल्वे उंच उंच गिरिशिखरे चढत जातांना मनांत आनंद आणि भीति यांचे तरंग एकसारखे उठत असतात. येथे मोटारीनेही जातां येते. मोटारीने प्रवास करितांना जेव्हां मोटार रांबोडो घाटाजवळ येते त्यावेळी तेथील अवर्णनीय वनश्रीपाहून प्रवासी तल्लीन होऊन जातो.

 हार्टन प्लेन नांवाचे मैदान नुवारा एलिया पासून १६ मैल आहे व त्याची उंची नुवारापेक्षा ८५० फुटांनी जास्त आहे. येथे शिकार चांगली मिळते असें ह्मणतात. कॅंडी जवळील परेडेनिया बागेची 'हकगलं' नांवाची शाखा नुवारा पासून ६ मैलावर आहे.

 नुवारा एलया येथे थंडी बरीच असते. रात्री घरांत शेंगडी असल्याशिवाय सुखाने झोप घेता येत नाही. सकाळी धुकेंही दाट पडलेले असते. विषुववृत्ताच्या अगदी जवळ असलेल्या प्रदेशांत असे शीत स्थल असल्यामुळे मनाला एक प्रकारचा अचंबा वाटतो.

 नुवाराला जाण्याकरितां कोलंबोहून रोज दोन गाड्या सुटतात. एक सकाळी निघते व एक रात्री निघते. कोलंबोहून नुवारास जातांना वाटेत "डेव्हन" नांवाचा अत्यंत प्रेक्षणीय असा धबधबा आहे.

श्रीपाद

 मध्य डोंगरांतील पश्चिम बाजूस ७२६० फूट उंचीच्या पर्वत शिखरावर श्रीपाद नांवाचे सीलोन मधील प्रसिद्ध क्षेत्र आहे. पूर्वी ४ फूट लांब व दोन इंच खोल अशी या ठिकाणी खांच होती. पुढे टांकीने या ठिकाणी मनुष्याच्या पावलाचा बरोबर आकार तयार केला आहे.

 या ठिकाणास पावित्र्य केव्हां आलें व येथे यात्रेकरू कधींपासून जाऊं लागले हे समजण्यास मार्ग नाहीं. तथापि हे ठिकाण वलंगबाहु राजा हरणाची शिकार करण्यात गेला असतां या स्थळीं ख्रिस्तपूर्व ९० साली येथे गेला व हे ठिकाण त्याने पाहिले होते असे ह्मणतात.