पान:लंकादर्शनम्.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आमचा सीलोनचा प्रवास

 रामेश्वराचे दर्शनाकरितां हजारो हिंदु दरसाल रामेश्वरास जातात पण तेथून केवळ २२ मैलावर असणा-या या सुंदर बेटांत जाऊन येऊ शकत नाहींत, किंवा जात नाहींत, सीलोन मध्ये हे प्रवासी कां जात नाहीत याची कारणेही निरनिराळी आहेत. काहीजण केवळ रामेश्वराचे दर्शनास गेलेले असतात ते सीलोनचा विचारही मनांत येऊ देत नाहीत. ज्यांच्या मनांत सीलोनमध्ये जावे असे येते त्यांना विशेष माहीती नसल्यामुळे आपला बेत रहित करावा लागतो.

 आह्मी नासिक येथून दक्षिण हिंदुस्थानांत जावयास निघतानाच सीलोनमध्ये जावयाचे ठरविले होते म्हणून तेथे जाण्यास पासपोर्टची जरूरी आहे की काय याबद्दलची तपास कलेक्टरच्या ऑफिसांत जाऊन केला. तेथे पुस्तकें वगैरे चाळून पहातां पासपोर्ट लागत नाहीं असे कळाले म्हणून आम्ही विशेष चिकित्सा न करितां नासिक सोडून निघालो.

 पुढे तंजावर येथे गेल्यावर आम्ही सहज एका कुंचे, बुजूंस वगैरे विकणाराच्या दुकानीं गेलो चे मालाचा तपास करू लागलो. बोलता बोलता दुकानदार सीलोनी आहे असे कळाले. त्या दुकानदाराने सीलोनमध्ये जाण्यास परवानगी लागते व ती परवानगी मिळाल्याशिवाय तुम्हांस जातां येणार नाहीं असे सांगितले.

 परवानगी मिळविण्याचे दोन मार्ग आहेत, ( १ ) सीलोनमध्ये राहणा-या माणसाने अमुक माणसे माझेकडे येणार आहेत असा अर्ज सीलोन गव्हरमेंटकडे करून पास घेऊन आपणाकडे पाठवावयाचे व ते पास आले ह्मणजे जावयाचे. (२) दुसरा मार्ग असा की, माणसी ५० रुपये मंडपम् कॅप येथे अनामत ठेवावयाचे व नंतर परवानगी घेऊन जावयाचे.