पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गुणविकास योजना
(इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना)

 'Education is the manifestation of perfection already in man'. अर्थात 'प्रत्येक माणसामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास म्हणजेच शिक्षण'. या स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण सूत्राभोवती ज्ञान प्रबोधिनीची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुंफलेली आहे. या प्रकियेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
 ११ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी नवीन संस्कार व कौशल्ये आत्मसात करण्यास योग्य असतात. हा वयोगट कोणतीही नावीन्यपूर्ण गोष्ट करायला नेहमी उत्सुक असतो. इयत्ता सातवीतील विद्यार्थी ह्याच वयोगटातील असतात. ह्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांच्या विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये एक योजना आखली गेली 'इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना'. ह्या योजनेमध्ये परीक्षा व गुणांकन पद्धतीचा स्वीकार केला व परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. गेली बारा वर्षे सातत्याने यशस्वीरीत्या ही योजना प्रशालेमध्ये राबविली जात आहे.
 ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असल्यामुळे येथील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसू शकत नाहीत म्हणूनही या योजनेची आवश्यकता वाटत होती. विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेसाठी अनेक विषय असतात. त्याच बरोबर त्यांना अन्य अनेक विषयांच्या विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. या अनेकविध परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता वाढावी म्हणून ह्या योजनेची आवश्यकता होती.
 आजचे शिक्षण म्हणजे नवनवीन माहिती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबून ती घोकायला लावणे व ती परीक्षेच्या वेळी जशीच्या तशी मांडायला लावणे. फक्त पाठ्यपुस्तकातील ठराविक अभ्यासक्रम आजच्या विद्यार्थ्याला शिकवून भागणार नाही. भावी जीवनात यशस्विता प्राप्त करण्याकरिता सतत नवनवीन ज्ञान त्याला मिळणे आवश्यक आहे. हे ज्ञान मिळविण्यासाठी त्याला वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. विद्यार्थ्याने सतत नवीन ज्ञान कसे मिळवावे, कुठून मिळवावे, त्याचे संकलन व मूल्यमापन कसे करावे याच्या पद्धती व कौशल्यांचा विचार प्रामुख्याने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजनेच्या वेळी करण्यात आला व

रूप पालटू शिक्षणाचे(३३)