पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यानुसार ह्या योजनेची ३ उद्दिष्टे ठरविण्यात आली -
 १) ठराविक पाठ्यपुस्तकांच्या चौकटीतून मुक्त अशी स्वयंअध्ययनाची कौशल्ये शिकविणे.
 २) विद्यार्थ्यांमधील शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लावणे.
 ३) विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना शोधून जागृत करणे व त्यांना अभिव्यक्त होण्यास संधी देणे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
 १) शिष्यवृत्ती ज्या गुणांसाठी दिली जाईल त्या गुणांचा उपयोग स्वत:च्या विकासाबरोबरच समाजासाठीही करता येईल असा दृष्टिकोन ठेवून अभ्यासक्रमाची योजना केली आहे.
 २) उपलब्ध असलेला वेळ, परिस्थिती आणि मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रम लवचिक आहे.
 ३) वाचन, लेखन, पाठांतर इ. कौशल्ये कायमस्वरूपी आहेत.
 ४) एक विषय हा दुसऱ्या विषयाशी संबंधित अथवा अंतर्भूत आहे.
 ५) विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिगत कल्पकतेला वाव आहे.
 ६) अभ्यासक्रमात काय करता (content) याबरोबरच कसे (process) करता यालाही महत्त्व आहे.
 उद्दिष्टांच्या पूर्ततेचा हेतू साध्य होण्यासाठी अभ्यासक्रमाचे खालील भाग केले आहेत.
१. गतिवाचन :- आकलनासहित वाचनाचा वेग (शब्दसंख्या प्रति मिनिट) मोजला जातो. वाचनवेग वाढीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत जुलै महिन्यात ४ ते ५ तासिका मार्गदर्शन केले जाते. प्रबोधिनीमध्ये या संदर्भात 'वाचन कौशल्य-कृती-गती- प्रगती' हे पुस्तक उपलब्ध आहे. वर्षाच्या प्रारंभी व वर्षाच्या शेवटी आकलन व वाचनवेग यांमधील फरक मूल्यमापनासाठी लक्षात घेतला जातो.
२. निवडक पुस्तके वाचणे व टिपणे काढणे :- वर्षारंभी १०० पुस्तकांची यादी दिली जाते. त्यातील कोणतीही ५० पुस्तके वाचायची असतात. त्यांची प्रत्येकी दोन ते अडीच पाने टिपणे काढायची असतात. या पुस्तकांच्या आवश्यकतेप्रमाणे २-३ प्रती ग्रंथालयात उपलब्ध केलेल्या असतात व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा पुस्तके बदलायला परवानगी असते. टिपणे कशी काढावीत, पुस्तके वाचताना कशी सुरुवात करावी इ. बाबत भाषा शिक्षक २ ते ३ तासिका मार्गदर्शन करतात. वर्षातून

(३४)रूप पालटू शिक्षणाचे