पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पद्धतीने शिकवायला लागेल.
 १) “काय ?' आणि 'केव्हा ?' या प्रश्नांपेक्षा का ?’ आणि ‘कसे ?' या प्रश्नांना अधिक महत्त्व असले पाहिजे. नवीन विषयाचे दर्शन झाल्यानंतर त्याविषयी अधिक उत्सुकता आणि गोडी निर्माण झाली तरच, का ? कसे ? हे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी, नवीन ठिकाणी गेल्यावर जसे निर्हेतुक फिरायला बाहेर पडतो तसे, त्या विषयात मुक्त संचार करायला शिकवले पाहिजे.
 २) मुक्त संचार करून का ? आणि कसे ? हे प्रश्न पडण्यासाठी परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्याऐवजी स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. शिकताना तरी प्रत्येकाने स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे. इतरांनी समोर ठेवलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत या भीतीतून करून घेतलेली पूर्वतयारी म्हणजे अध्यापन नाही.
 ३) एका प्रश्नाला एकच बरोबर उत्तर असते, ते लक्षात ठेवून योग्य वेळी ते सांगता आले पाहिजे, हे अध्यापन नाही. त्यात स्मरणशक्तीपेक्षा आकलनाला महत्त्व देणारी थोडी सुधारणा म्हणजे प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायांतून निवडायला शिकवणे. या पद्धतीचा थोडा उपयोग निश्चित आहे. परंतु इतरांनी दिलेल्या पर्यायांमधून एक पर्याय निवडण्यापेक्षा एका प्रश्नाला अनेक पर्यायी उत्तरे स्वतः तयार करण्याला व्यवहारामध्ये जास्त महत्त्व आहे. याचे प्रशिक्षण देणे जास्त महत्त्वाचे आहे.
 ४) स्वयंअध्ययनाच्या आधारे निरीक्षण, आकलन, स्मरण ही कौशल्ये साधलेल्या विद्याथ्र्यांना अध्यापकांनी उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्तीचा वापर कसा करायचा हे खरे शिकवायला पाहिजे. पूर्वतयारीतल्या त्रुटी भरून काढता काढता विद्यार्थ्यांना निरीक्षण, आकलन, स्मरण या बाबतीत लवकर स्वावलंबी बनवणे हे बौद्धिक शिक्षणातले पहिले उद्दिष्ट आहे. त्यापुढे त्यांना उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्ती यांचा वापर करण्यास शिकविणे हे अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षणासाठी अनुकूल वातावरण
 अध्यापनाचा हेतू, अध्यापनासाठी पूर्वतयारी आणि अध्यापनाची सूत्रे पाहिली. अशा विशिष्ट हेतूने, विशिष्ट पद्धतीने, अध्यापन करायचे असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करावी लागते. असे वातावरण केवळ अध्यापनासाठी नाही तर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. घरचे संस्कार चांगले होण्यासाठी, शाळेतील औपचारिक अध्यापनासाठी, युवक संघटनेमध्ये गटातील आंतरप्रक्रियांमुळे


रूप पालटू शिक्षणाचे (५)