पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणा-या विविध पर्यायांच्या दर्शनासाठी, अनुकूल वातावरणाची गरज आहे.
 नम्रता आणि आत्मविश्वास, आत्मकेंद्रिततेच्या स्पर्शाशिवाय येणारी ध्येयनिष्ठा, लहान-मोठ्या गटांमध्ये नि:स्वार्थीपणे सहकार्याने काम करायची वृत्ती अशा गुणांचे विकसन शिक्षणाच्या चारही माध्यमांमधून व्हायला पाहिजे. सक्षम, प्रेरणासंपन्न आणि सहयोगी वृत्तीने काम करणारे युवक-युवती घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट शाळेमध्येही साध्य करायचे आहे. या सर्व गुणांचा परिपोष होण्यासाठी साचेबंद पद्धती चालणार नाही. पूर्णपणे चाकोरी सोडून विचार करण्याचे स्वातंत्र्य; स्वतंत्रपणे विचार करून विधायक निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा आग्रह; स्नेह, आत्मीयता आणि निश्चिंतता यांनी युक्त परस्परसंबंध; अशा वागण्यामुळे, अशा धोरणांमुळे निर्माण होणारे वातावरण उत्तम शिक्षणासाठी आवश्यक आहे. असे वातावरण शाळेत निर्माण झाले, अध्यापक व विद्यार्थी यांच्यामध्ये व्यक्तिगत हार्दिक्याचे नाते निर्माण झाले तर प्रगतिशील अध्यापन पद्धतीचा परिणाम अधिक प्रकर्षाने होतो.
शाळेतील शैक्षणिक भूमिका
 वरीलप्रमाणे शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचे असेल तर शाळेतील रूढ शैक्षणिक भूमिका बदलायला लागतात. अध्यापन माहिती-प्रधान असण्याऐवजी प्रक्रिया-प्रधान झाले पाहिजे हे पाहिले. पण तसा बदल करायचा झाला तर परीक्षा, मूल्यमापन, बक्षिसे, उत्तेजन या सर्वच भूमिकांमध्ये बदल करावा लागतो. शाळेबाहेरील सामाजिक पर्यावरणाच्या विरोधी असा हा बदल असल्यामुळे तो करण्यातही अडचणी येणार व त्याला यश देखील कमी-अधिक प्रमाणात मिळणार. पण या दिशेने टाकलेले एक-एक पाऊल देखील शिक्षणाचे हेतू साधण्यास उपयोगी पडते.
 माहिती किती ग्रहण केली हे मोजता येते. एखाद्याने प्रक्रिया किती आत्मसात केली हे मोजणे अवघड आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांशी त्याची तुलना करणे अवघड आहे.म्हणून स्पर्धांचे स्वरूप बदलून स्वत:शीच स्पर्धा करणे याला महत्त्व द्यावे लागते. स्वत:च्या आधीच्या उपलब्धींपेक्षा ज्यांनी ज्यांनी प्रगती केली ते सर्व अशा स्वत:शी केलेल्या स्पर्धेत यशस्वी झाले. प्रोत्साहन-बक्षिसे-पुरस्कार देताना निवडक विद्यार्थ्याऐवजी सर्वांच्या यशाची नोंद घेणे आणि सहभागासाठी देखील बक्षीस देणे असे धोरण ठेवावे लागते. सहभाग सर्वांचा, बक्षीस सर्वांना, स्वत:शी स्पर्धा आणि इतरांशी सहकार्य या गोष्टी वाढवणारी योजना सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये असायला हवी.





(६) रूप पालटू शिक्षणाचे