पान:रुपया.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६२ ]

 सरकारने आजपर्यंत बँकिंग न केल्यामुळे असे होते की, करांच्या रूपाने आलेले पैसे सरकारजवळ पडून राहतात व लोकांना चलनाची जरूर लागेल त्यावेळेस किंवा कर्ज लागेल त्या वेळेस हे पैसे लोकांना देण्याचा कांहींच मार्ग राहत नाही. ही शिल्लक शेवटीं इंग्लंडांत जाऊन पडते व तिकडील लोकांस मात्र आमचे पैसे सोप्या व्याजाने वापरण्यास मिळतात. वास्तविक पहातां ही शिल्लक आमची आम्हास येथेच परत मिळण्याची सोय होणे आवश्यक आहे. सरकारी बँकांच्या द्वारे सरकारचे काही पैसे लोकांस परत मिळतात हे खरे; परंतु ही रक्कम अगदीच थोडी असल्यामुळे, सरकारी शिलकेचा लोकांचे चलन वाढविण्याच्या कामांत कांहींच उपयोग होत नाही. अशा तऱ्हेच्या चलनास एकच उपाय आहे. तो हा की, सोन्याचे नाणे करून सोन्याच्या नाण्यावर आधारभूत अशा नोटा काढून इंग्लंडप्रमाणे चेक ' ची पद्धति अमलात आणणे.

 हल्लींच्या नोटांच्या पद्धतीत नोटा वाढविण्याची कांहीं युक्ति नाहीं. चेक प्रचलित झाल्यास, जास्त चलन जेव्हां लागेल, तेव्हां चेक देतां येतात व चेकच्या योगाने देणे घेणे झाल्यानंतर है चेक एकत्र करून, त्यांची रमारमी करून, ते फाडून टाकतात. आतां नवीन होणाऱ्या इंपीरियल बँकची एक शाखा प्रत्येक जिल्ह्यांत उघडून, चेकची पद्धति सुरू करावी. हल्लीच्या पद्धतीत जास्त रुपये किंवा नोटा पाहिजे असल्यास, एक तर कौन्सिलनिक पैदा केले पाहिजे किंवा पौंड आणिले पाहिजेत.