पान:रुपया.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना

 स्वार्थसाधनास अतिशय उपयोगी अशी जी अनेक शास्त्र आहेत् त्यांमध्ये ' अर्थशास्त्र' हे महत्वाचे आहे. या शास्त्राचा अभ्यास पाश्चात्य राष्ट्रांत फार बारकाईने केला जातो; परंतु भारतवर्षांत या शास्त्राविषयी ज्ञान अत्यल्प प्रमाणावर दिसून येते व नवीन शोधाचा तर पूर्ण अभावचे आहे. ही स्थिति बदलण्यास जी अनेक साधने आहेत, त्यांत वाङ्मय तयार करणे हे मुख्य आहे. आबालवृद्धांमध्ये अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार झाल्याशिवाय योग्य मते तयार होणार नाहींत व मते तयार झाल्यावांचून आचरणावर बरिणाम होणार नाही.

 आर्थिक उन्नतीचा प्रश्न हा फावल्या वेळच्या घटपटादि वाक्याप्रमाणे नसून, माध्यान्हवेळच्या भोजनाचा अथवा “ भाकरीचा प्रश्न आहे. हिंदुस्थानांतील लोकांची सरासरीची वार्षिक प्राप्ति अदमासे तीस रुपये आहे, ती निदान शंभर रुपये तरी झाल्याशिवाय जगाच्या स्पर्धेमध्ये प्रयत्न करण्याचीही शक्ति आह्मास राहणार नाही याची जाणीव उत्पन्न व्हावी ह्मणून या विषयाचे सांगोपांग विवेचन करण्याकरितां, आह्मीं अर्थशास्त्राच्या अनेक शाखांवर लिहिण्याचे योजिले आहे. इंग्लंडांतील युद्धपूर्व शिलिंग एडिशनप्रमाणे ' या पुस्तकाची किंमत एक शिलिंग म्हणजे बारा आणे ठेवण्याचा संकल्प होता; परंतु मुद्रणसाधनांच्या महर्घतेमुळे हा संकल्प मुर्तस्वरूप पावू शकला नाहीं.