पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे आणि जातही चिटकवली आहे. आणि मग समस्या... अडचणी सुरू होतात. मंग तो दोन जीवांच्या... मनांच्या बांधिलकीचा मुद्दा रहात नाही! कुठे नि कुणाच्या घरी... पोटी जन्माला यायचे ते जन्मणाऱ्या व्यक्तीच्या हाती कुठे असते? त्यांत जीव... मन हे पिकातलं ढोर.

किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर...

 दोन मनाजीवांची ओढ धर्म, जातीला गिमत ...मोजत नाही. मग वर्तमानपत्रांतून बातम्या... 'आंतरजातीय विवाहीत जोडप्याला जाळून टाकले.' 'भिन्न धर्मीय प्रेमी युगुलाची आत्महत्या' वगैरे वगैरे.
 परदेशात तर सत्तरीचा 'तरूण' तिशी पंचविशीच्या पोरीच्या प्रेमात पडून विवाह करतो. आपल्याकडे असे पूर्वी होई. तो 'प्रेमात' पडून नसे तर जबरदस्तीने केलेला जरठकुमारी विवाह असे. अलिकडे मात्र असे क्वचित् होते. पण त्यामागे बापाची लालसा असते. प्रितीची फलश्रुती विवाहात होण्याचा संकेत आहे. पुढच्या पिढीला ... त्यांच्या पोटी जन्मणाऱ्या लेकरांना समाजमान्यता मिळणाच्या दृष्टीने ते सोयीचे असते. हा संकेत काहीजण पाळत नाहीत. विवाहाचा उपचार बाजूला ठेवून बांधिलकी मानून एकत्र राहतात.
 मग पुन्हा प्रश्न. प्रेमात देहाची एकरूपता हवीच का? त्याशिवाय प्रेमाला परिपूर्णता येतच नाही का? अशारितीने प्रेम हे अधिक सकस ...श्रेष्ठ म्हणायचे का?
 मध्यंतरी अगदी जवळचे स्नेही घरी आले. त्यांना कन्येने परधर्मीय मुलाशी लग्न ठरवले. ते दोघे उच्चशिक्षित. दोघांच्या व्यावसायिक पदव्या पूरक. एक ॲनेस्थेटिक मधली उच्च पदवी धारक तर दुसरी व्यक्ती निष्णात शल्य चिकित्सक. लेकीने सांगितले मी लग्न याच्याशीच करणार. तुमचे आशिर्वादही हवेत. ते मिळणार नसतील तर विवाहाचा उपचार करणार नाही. पण बांधिलकी रहाणारच. मायबाप दोघही उच्चशिक्षित. वडिलांची भूमिका, धर्म कोणीच बदलू नये. आणि ही कोंडी भारतीय संविधानाचे रचनाकार ज्ञानतपस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवली आहे. नोंदणीकृत विवाहात जात धर्म काहीच आडवे येत नाही.
 प्रेम हे दोन जीवांचे... मनांचे असते, ते डोळ्यातून वाचता येते. बांधिलकी या शब्दातच दृढता असते. माया, ममता, करूणा या शब्दांतून वात्सल्य प्रतीत होते. प्रेम त्या वेगळे असते. प्रेमात 'दर्द' ... 'आर्तता' असते. ज्ञानदेवांनाही विठ्ठलाच्या सायुज्यतेची ओढ विराणीतून व्यक्त करावी लागली.

रुणझुणत्या पाखरा / ५९