पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कवी कल्पनेच्या क्षितीजावर सतत नवनवे अंकुर फुटत असतात. कालिदास हा 'कवि कुलगुरू'. श्रेष्ठ भारतीय कवींची मोजदाद करावी म्हणून कालिदासाच्या नावाने करंगळी मोजली. आता दुसरे नाव? त्याच्या इतक्या योग्यतेचा दुसऱ्या कवीचे नाव सुचेना आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव पडले अनामिका.

अनामिका सार्थवती बभूव

 अनामिका हे नाव सार्थच ठरले.
कालिदास हा नाटककार होता. 'शाकुन्तलम्' या नाटकाचा अनेक परदेशी भाषात अनुवाद झाला. कालिदासाच्या जन्ममृत्यू बद्दल अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यातली एक अशी. कालिदास जन्मला ब्राह्मण कुटुंबात. परंतु लहानपणी आईवडिल मरण पावल्याने एका गवळ्याने त्याला वाढवले. तो देखणा, सुदृढ व बुद्धिमान होता. मात्र गुरुकुलात शिक्षण घेऊ शकला नाही. शेजारच्या राज्याच्या राजकन्येचा विवाह तेथील कपटी प्रधानाने या देखण्या मुलाशी लावला. आपला पती विद्या विभूषित नाही हे लक्षात येताच तिने त्याला हाकलून दिले. नंतर त्याने कालीमातेची उपासना केली वगैरे वगैरे... असला दैवी जोड देऊन कथा पूर्ण करण्यात आपली ख्याती आहेच. त्याने एखाद्या गुरूकुलात जाऊन विद्या ग्रहण केली असावी. असे म्हणूया. नंतर तो राजकन्येकडे आला. तिने त्याला प्रश्न केला "अस्तिकश्चिद् वाग्विशषः? तुझ्या वाणीत काही विशेष गुण आले का?
 कालिदासाने या प्रश्नातील प्रत्येक शब्दांपासून सुरुवात होणारे तीन काव्यग्रंथ निर्माण केले. 'अस्त्युत्तरस्यां दिशी देवात्मा' ही शिवपार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. ही कुमारसंभवम् या काव्याची सुरूवात आहे. 'कश्चित्कान्ता विरह गुरूणा' ही मेघदूत या जगद्विख्यात रचनेची सुरूवात. तर, 'वागर्थाविवसंपृक्तौ' ही रघुवंश या काव्याची सुरुवात.
 कालिदास हा गुप्त घराण्यातील दुसरा चन्द्रगुप्त विक्रमादित्य याच्या दरबारात राजकवी होता. त्याचे वास्तव्य उज्जैनीत होते असे मानले जाते. त्याला हिमालयाचे विशेष आकर्षण होते.
 ...मेघदूत हे कवि प्रतिभेतून साकारलेले काव्य. त्याला पुराण वा देवकथेचा आधार नाही. त्याचे कथानक असे... एका यक्षाकडे ड्यूटी होती इन्द्रदेवाच्या पूजेसाठी १०८ कमळे आणून त्यातील भुंगे काढून टाकण्याची. हे काम करतांना यक्षाला सतत आठवण येत होती पत्नीशी केलेल्या शृंगार क्रीडांची. त्या व्यवधानात एका कमल कलिकेतला भुंगा आत तसाच राहिला. तो देवन्द्र इन्द्राला चावला. मग अर्थातच शाप.

३६ / रुणझुणत्या पाखरा