पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 अगदी अशात मध्य प्रदेशातील लेखिका मेहेरूनिसा परवेझ यांची कथा वाचण्यात आली. त्या विशिष्ट जमातीत मोठी मुलगी वयात आली की, तिला साग्रसंगीतपणे देवीला अर्पण करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. मेहंदी चढविण्याच्या रिवाजापासून ते पहिली रात्र सजविण्यापर्यंतचे सर्व रिवाज खऱ्याखुऱ्या लग्नासारखेच. मात्र त्या रात्रीची बोली. किंमत, बाप वा मोठा भाऊ ठरविणार. प्रत्येक घरात बडी बुआ... आत्या, एखादी आजी 'अशी' असणारच. मग गावात वा मोहल्ल्यात जी सर्वात वयस्क आजी असेल, तिने त्या दोघांना खोलीत बंद करून दाराला बाहेरून कडी लावायची. त्या खोलीला बिनगजाची एक खिडकी. पहाट होत आली की पहिल्या रात्रीच्या मालकाने त्या खिडकीतून पळून जायचे. सकाळी भाचीला सुगंधी स्नान घालून मोठ्या आत्याने तिला गावाबाहेरच्या देवीला नेऊन आणायचे... गावातील प्रत्येक स्त्री-पुरूष हा धार्मिक(?), पांरपारिक विधी नेमकेपणाने पार पडतो की नाही हे पाहण्यात दक्ष असणार. कारण त्या पुण्यमय विधीत त्या व्यक्तीचाही खारीचा वाटा. मात्र पोरीच्या मनातील वादळांची दखल कोण घेणार? त्या कथेतील राणीने त्या मोकळ्या खिडकीचा उपयोग विषव्यूहातून पळून जाण्यासाठी केला. एका तरूण शिक्षकाने तिच्या भांगात सिंदूर भरून तिचा चेहरा ओढणीने झाकून 'कुलवधू' होण्यासाठी मदत केली. पण ही एक कथा. कल्पित सत्याच्या अवकाशातली. प्रत्यक्षात अशा किती 'राणी' सापडतील!

रुणझुणत्या पाखरा / ७