पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " ताई मला कामच द्या. माझ्या दोन मोठ्या... वयात असलेल्या लेकी घेऊन दिलासाघरात राहायला संकोच वाटतो. जवळच एखादी पत्र्याची खोली घेऊन राहते. मोठी दाहावीत आहे. धाकटी आठवीत. दोघी जवळच्या झेड्पीच्या शाळेत जातात... सांगाल ते काम करत. " सुमन सांगत होती. तिचा नवरा दुसऱ्या बाईच्या आणि बाटलीच्या नादी लागला आहे. तो परळीच्या डाळीच्या कारखान्यात काम करतो. डाळी तयार करण्यात प्रवीण असल्याने मालक सोडत नाही. पगारही बऱ्यापैकी आहे. तिथे हाताखाली काम करणाऱ्या, नवरा नसलेल्या एका बाईच्या नादी लागलाय. अलीकडे सुमनला, दोन्ही लेकींना सतत मारहाण करी. सुमन तेथेही धुणीभांडी करीत असे. तिला मिळणाऱ्या पैशांवरही नवऱ्याचा डोळा असे. शेवटी हताश होऊन ती इथे आली. संस्थेच्या मेसमध्ये काम करू लागली. भावांना वाटे सुमनने त्यांच्याजवळ रहावे. जे मिळेल त्यात सर्वांनी भागवावे. पण सुमाला ते पटले नाही.
 'ताई, कायम माघारी आलेली नणंद भावजयांना बोचणारच की. त्यांची वानीकिनीची दोन लेकरं, उद्या ती मोठी व्हायची. त्यांच्या शिक्षण, कपड्यालत्त्याचा खर्चा. त्यात आमची तिघांची भर कशाला? दोघं भाऊ वाड्यातच वेगळे रहातात. मोठ्याकडे माय रहाते. वडील मागेच खर्चले. ते एक परीन बरंच झालं म्हणायचं. आमी रहावं तरी कोणाकडं? गांजव्याचा अर्धावाडा वडलांनी विकला, धा एकर जमीन बी विकली तवा कुठे आम्हा तीन बहिणींना घराबाहेर काढता आलं. सोभाव चांगलाय. दोन पोरी झाल्यावर पोरासाठी हट्ट धरला नाही. माजं आपरीसन करुन घेण्यासाठी माझं

१४० / रुणझुणत्या पाखरा