पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तो परिसर बहुदा तरूणाईने भारलेला असावा. सगळेच तरूण. नजरेत नवनव्या कृतिशील स्वप्नांचे उंचवटे. हात सतत काही नवे करण्यात गुंतलेले. टमाटे, वांगी, मिरच्या, काकड्या, मुळे, गाजरे, पालक, मेथी, कोबी.. अशा तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या हळुवार हातांनी खुडून बांबूच्या टोपल्यात टाकणारे उत्फुल्ल हात. दुसऱ्या परिसरात बाया.. पुरूषांचे. काही जण चिंध्यांचे रंगानुसार ढीग घालणारे तर काही जण यंत्रावर त्यांना पिंजणारे, त्यांची पोती भरणारे. परिसरातील प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर निरोगी.. निरामय हास्य. आणि स्वागतशील हात. जवळजवळ पाचसाडेपाचशे एकरांच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब साठवून तयार केलेले पाण्याचे साठे. त्यावर पिकणारे गहू, ज्वारी, हरबरा, भुईमूग, सूर्यफूल, करडई, साळ, सोयाबिन.. यांची लहरती शेते. भाताची कापणी, मळणी झालेली. तरुणाईचे हात जेव्हा श्रममग्न असतात तेव्हा समृद्धी शेजारी येऊन उभी रहातेच. ही सारी त्या हातांची किमया.
 त्या परिसरातील हजारो हातांना उर्जा देणारा ब्याण्णव संपून त्र्याण्णवात पदार्पण करणारा हा तरुण गेली अनेकवर्षे आडवाच... झोपूनच आहे. पाठीला पट्टा बांधून तास्-नतास उभे राहून अनेकांना उभे करण्यास उद्युक्त करणारा. जीवनरस गेली अनेकवर्षे देणारे बाबा आता मात्र आडवे झोपून तेच काम करीत आहेत. पहाटे पाचला तयार होऊन एका हातगाडीवर झोपून तो युवा अडिच तीन किलोमिटर्स परिसराला वळसा

रुणझुणत्या पाखरा / १२३