पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 २७ ऑगस्ट १९९५ ची संध्याकाळ. अगदी बावरलेली गोंधळलेली. भारतातील चारशे-साडेचारशे महिला कार्यकर्त्या बीजिंगच्या दिशेचा ध्यास घेऊन, गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्याने रिक्षा वा टॅक्सीतून धावताहेत. मयुरी ट्रॅव्हल्सची वीणा विश्वानाथन् अनेकींच्या ओठांवर नाचतेय नि साऱ्याजणी कॅनॉटप्लेस परिसरातील त्यांच्या कार्यालयाभोवती अक्षरश: भिरभिरताहेत. त्यात मीही आहे.
 'म्हारो तो थई गयो... दो बेननो होटल कन्फर्मेशन आव्यो नथी अे...' 'कस्तुरीका पासपोर्ट आज मिलेगा शायद...'
 'हेमा तर वैतागलीय. धावाधाव तरी किती करावी? तरी तिचा नवरा खूप मदत करतोय...'
 अशा अनेकविध उद्गारांचे थवे भवताली. महाराष्ट्रातल्या विद्या, हेमा, आशाअपराद, ज्येष्ठ भगिनी मेहरून्निसा दलवाई यांचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. पण चीनमध्ये राहण्याच्या जागेची निश्चिती कळलेली नाही. हॉटेल कन्फर्मेशनं पत्र मिळालेलं नाही त्यात २६ ला शनिवार नि २७ ला रविवार. दोन दिवस चायना एम्बसी बंद. मग वावड्यांची वावटळ.
 छत्तीसगडमधील खेड्यात काम करणारी, सुरेख ढोलक वाजवणारी विशीतली कस्तुरी आशेनं प्रश्न विचारते.

रुणझुणत्या पाखरा / ९५