पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'हिंदुत्ववादी' हे प्रकरण निदान मुस्लिम वाचकांनी प्रथम वाचावे असा माझा त्यांना सल्ला राहील. त्यामुळे आधीच विकृत दृष्टीने हमीद दलवाई यांच्याकडे पाहण्याचे टळेल व त्यांचे विचार निर्लेप मनाने समजावून घेता येतील.

::::

 हमीद दलवाईंना जाऊन पाव शतक पूर्ण झालेले आहे. त्यांच्या हयातीतील कट्टरता कितीतरी पटींनी वाढलेली आहे. हिंदुत्ववादी तर, अधिक आक्रमक नव्हे तर अधिक हिंसक बनले आहेत. आज संघ परिवार हिंदू राष्ट्राची जोरकस तरफदारी करू लागला आहे. संघपरिवाराचे नवीन सरसंघचालक श्री. सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जे व्यक्तव्य केले ते महाभयंकर, विकृत व विनाशकारी होते. सरसंघचालक झाल्यावर व संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या विशेष बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पहिलीच मुलाखत होती. त्यात त्यांनी हिंदू व बिगरहिंदू यांच्यामध्ये महाभारतकालीन युद्धाप्रमाणे महायुद्ध भडकेल असे मत मांडलेले होते. संघपरिवाराने यादवीचाच शंख फुंंकला. ही मुलाखत १९ मार्च २००० च्या 'पांचजन्य' व 'ऑर्गनायझर' या त्यांच्या पत्रांतून आलेली आहे. नंतर त्यांनी हे विधान मागे घेतले असल्याचे जाहीर केलेले असले तरी ती माघार संघ स्वयंसेवकांसाठी नाही हे ते खचितच जाणून असतील. संघाच्या ठरावामध्ये १९८८ पर्यंत अयोध्या हा विषय नव्हता, परंतु संघपरिवाराने विश्व हिंदू परिषदेच्या आडून किती धुमाकूळ घातला आहे हे आपण अनुभवतच आहोत. १९६० पासून जातीय दंग्यांचे प्रमाण वाढीस लागले असून रांची, जमशेदपूर, मोरादाबाद, बिहार शरीफ, हजारीबाग, नेली, जळगाव, अहमदाबाद, मुंबई आणि आता गुजरात येथे झालेले दंगे पाहता हिंदू-मुस्लिम समाजांतील दरी रुंदावत आहे याचा प्रत्यय येतो. गुजरातमधील दंगल ही केवळ गोध्राची प्रतिक्रिया आहे हे मुख्यमंत्री मोदी यांचे विधान माणुसकी व संवेदनशीलता नाकारणारे आहे. सत्ताधारीच भारतीयांमध्ये धर्मावरून फरक करू लागले तर ते यादवीला पाचारणच ठरेल. विश्व हिंदू परिषदेचे गिरिराज किशोर तर 'इंदिरा गांधींचा खून झाल्यावर चार हजार शिखांच्या हत्या झाल्या' अशी माणसुकीहीन आकडेवारी मांडू लागले आहेत. डॉ. रफीक झकेरिया यांनी १९९५ साली 'दि वायडनिंग डिव्हाईड' असे पुस्तक लिहिले आहे, त्या पुस्तकात त्यांनी दिल्लीतील आपले १९७१ मधील भाषणही छापलेले आहे. त्या भाषणातील त्यांची वाढती निराशा मनावर एक त-हेचे मळभ निर्माण करते. आफ्रिकेतील टोळीयुद्धाचे स्वरूप आजकालच्या दंग्यांना येऊ लागलेले आहे. गुजरातमधील दंग्यांबाबत विद्या सुब्रह्मण्यम् या पत्रकर्तीचा लेख, श्री. हर्ष मंदेर या आय.ए.एस. अधिकाऱ्याचा 'टाईम्स ऑफ इंडिया'तील लेख आणि राष्ट्रीय मानवाधिकार समितीने गुजरात सरकारवर ठेवलेला ठपका पाहता संघ परिवार कोणत्या थराला गेलेला आहे याची जाणीव होते. संघ परिवाराचे महान गुरू गोळवलकर यांनी 'वुई:दि नेशनहूड डिफाईंड' व 'बंच ऑफ थॉट्स' यामध्ये हिटलरने ज्यूंचे जे शिरकाण केले त्यापासून धडा शिकला पाहिजे अशी मांडणी केलेली आहे. आता हिटलरच्या शिष्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला आहे काय, असा विचार आपल्या मनापुढे उपस्थित होतो. सामाजिक दुरावा दिवसेंदिवस वाढीस लागलेला

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/७