पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असून त्यामुळे भारतीय प्रजासत्ताकापुढे एक महान संकट उभे राहिलेले आहे. यामध्ये हिंदू जमातवाद्यांचा वाटा फार मोठा आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही.

::::

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुमहासभा संपुष्टात आल्यानंतर व विशेषत: सावरकर यांच्या निधनानंतर संघ परिवार हाच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करीत आहे. सावरकरांच्या हयातीत गुरू गोळवलकरांचे व त्यांचे कधीही पटले नाही. ज्या काळी सावरकर ‘संघाने राजकारणात सहभागी व्हावे' असा आग्रह धरीत होते, तेव्हा संघ परिवाराने आपली कार्यक्रमपत्रिका वेगळी आखलेली होती. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांचे तीव्र मतभेद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली आणि तेव्हापासून त्यांनी मुस्लिम जातीयवाद्यांप्रमाणेच स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यापासून कटाक्षाने दूर ठेवले. त्याचे कारणही उघड आहे. महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याने काही मूल्ये उराशी बाळगलेली होती. त्यामध्ये लोकशाही प्रणाली, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, भारतातील संमिश्र संस्कृतीचा विकास व समाजवाद ही मूल्ये प्रमुख होती. स्वातंत्र्यलढ्यामध्ये सामील होणे म्हणजे ही मूल्यव्यवस्था स्वीकारणे असा त्याचा अर्थ होता. या मूल्यव्यवस्थेला संघजनांचा किती विरोध होता, हे त्यांच्या अलीकडील वक्तव्यावरूनही कळून येते. पूर्वीचे संघप्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नेते अशोक सिंघल म्हणाले की, “आम्ही समाजवाद संपविला, आता आम्हाला धर्मनिरपेक्षता संपवायची आहे." संघाने आपल्या स्थापनेपासून हिंदुराष्ट्रसंस्थापनेचे अत्यंत चुकीचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यांपुढे ठेवले असून गेली पंचाहत्तर वर्षे येनकेन प्रकारे, वेळप्रसंगी लांड्या-लबाड्या, अफवाप्रसार, आक्रमकता व हिंसाचार करूनही ते त्या दिशेने पुढेपुढे सरकू पाहत आहेत. लोकशाही प्रणालीमध्ये हे उद्दिष्ट साध्य होणे शक्य नाही हे लक्षात घेऊन ते लोकसंसदेपुढे धर्मसंसदेचे आव्हान उभे करू पाहत आहेत. त्यांच्या हाती बहुमताची सत्ता मिळताच लोकशाही प्रणाली नष्ट करण्यास त्यांना यत्किंचितही दिक्कत वाटणार नाही. त्यासाठीही हिटलरचा धडा त्यांच्यापुढे आहेच. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आम्ही मानणार नाही, अयोध्या हा भावनेचा प्रश्न आहे, असे पूर्वी सरसंघचालक देवरस यांनी मांडलेलेही होते. या बाबतीत पाकिस्तान निर्मितीचा प्रयत्न कोणत्याही मार्गांची तमा न बाळगता करणाऱ्या बॅ. जीनांशीच त्यांची तुलना होऊ शकते. किंबहना बॅ. जीना यांचे शिष्यत्व पत्करूनच त्यांच्या प्रत्यक्ष कृती-कार्यक्रमाप्रमाणे श्री. सुदर्शन यांनी हिंदू व गैरहिंद यांच्यातील महायुद्धाची कल्पना मांडलेली आहे. हिंदू समाज एकच विशिष्ट ग्रंथ मानणारा नसल्याने, अनेक देवदेवतांचे संप्रदाय त्यात असल्याने आणि अनेक नास्तिक दर्शनांचा त्यात सहभाग असल्याने आक्रमक बनण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळेच अन्य धार्मिक समूहांना आपल्यामध्ये गुण्यागोविंदाने सामावून घेण्याची परंपरा हिंदू समाजात निर्माण झालेली होती. परंतु हा समाज सहनशील न राहता आक्रमक बनावा या हेतूनेच संघपरिवाराने हिंदू जमातवादाची कास धरलेली आहे. त्यातूनच बजरंग दल व त्यांचा त्रिशूल पुढे आलेला आहे.

८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान