पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लीगचे अध्यक्ष इस्माईल चुंद्रिगर म्हणाले, ज्या हिंदूंवर आम्ही पाचशे वर्षे राज्य केले त्यांना सत्ता देण्याचा ब्रिटिशांना अधिकार नाही. श्री. महमद इस्माईल म्हणाले, भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानसाठी हिंदूंविरुद्ध जेहाद आरंभिले आहे. (हेच महमद इस्माईल सध्याच्या भारतीय मुस्लिम लीगचे अध्यक्ष आहेत आणि भारतात अधूनमधून होणाऱ्या दंगलींच्या वेळी 'बहुसंख्यांक हिंदू दंगली करीत असतात आणि मुसलमान हे दंगलींचे निर्दोष बळी आहेत' असे म्हणत असतात.) सर फिरोजखान नून म्हणाले, आम्ही अशा कत्तली करू की चेंगीजखानालाही लाज वाटेल. ही प्रक्षोभक भाषणे झाली तेव्हा जीना उपस्थित होते. त्यांनी एका शब्दाने कुणालाही आवरले नाही हे पुरेसे सूचक आहे.

 भारतातील हिंदू-मुसलमानांनी आपसात तडजोड केल्याखेरीज आम्ही स्वातंत्र्य देणार नाही ही मुस्लिम समाजाला व्हेटो देण्याची ब्रिटिश भूमिका प्रथमपासून होतीच ती शेवटपर्यंत कायम राहिलेली आहे. महायुद्ध सुरू होताना भारतीय नेत्यांबरोबर तडजोड घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने सर स्टॅफर्ड क्रिप्स् यांना ब्रिटिश सरकारने भारतात पाठविले होते. त्यांनी सुचविलेल्या योजनेत प्रांतांना फुटून निघण्याचे स्वातंत्र्य देऊन ब्रिटिश सरकारने तत्त्वत: पाकिस्तानची मागणी मान्य केली होती. येथे ब्रिटिशांच्या धोरणाची चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. हिंदूमुस्लिम प्रश्नासंबंधी ब्रिटिशांनी पक्षपाती भूमिका बजावली हे आता गुपित राहिलेले नाही. परंतु त्यांच्या भेदनीतीमुळे हिंदू-मुस्लिम प्रश्न निर्माण झाला असे मानण्याएवढा मी स्वप्नाळू, आदर्शवादी नाही. कुठलीही परकीय सत्ता आपली सत्ता टिकविण्यासाठी भेदनीती वापरते. ब्रिटिश याला अपवाद ठरणे शक्य नव्हते. भारताचे एक राष्ट्र घडवून आणण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडायला ब्रिटिश येथे आले नव्हते. ते उघड उघड शोषण करायला आले होते. आणि शोषणाचा काळ अधिकाधिक लांबविणे हे त्यांच्या दृष्टीने त्यांचे कर्तव्य होते. शिवाय ब्रिटिशांनी हिंदू-मुसलमानांबाबतच भेदनीती वापरली असे नव्हे. हरिजनांना हिंदूंपासून . वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच. शिखांना चुचकारून पाकिस्तानला अनुकूल बनविण्याचे प्रयत्नही ते करीत होतेच. याकरिता आपले खास दूत ते शीख नेत्यांकडे पाठवीत होतेच. (पहा - Divide and Quit) आणि गिरिजनांना एका वेगळेपणाची जाणीव निर्माण करून देण्याचे त्यांचे प्रयत्नही चालूच होते. गिरिजन एखाद्या विशिष्ट विभागात एकवटलेले नव्हते म्हणून ब्रिटिशांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. वेगळे मतदारसंघ देऊन हरिजनांना वेगळे करण्याचा प्रयत्न गांधीजींच्या उपोषणाच्या धमकीने आणि आंबेडकरांनी गांधीजींना . सुज्ञपणे दिलेल्या प्रतिसादामुळे हाणून पाडला गेला. शिखांना चुचकारण्यात ब्रिटिशांना यश आले नाही. वस्तुतः शिखांनी कुठल्या पक्षात राहावे हे सांगण्याचे ब्रिटिशांना काही कारण नव्हते. पंजाबची फाळणी टाळावी हा ब्रिटिश सरकारचा हेतू होता असे बरेच प्रवक्ते सांगतात. पंजाबची शेती आणि अर्थव्यवस्था फाळणीत उद्ध्वस्त होईल याची ब्रिटिशांना काळजी लागून राहिली होती. वस्तुत: त्यांची खरी चिंता सबंध पंजाबचा पाकिस्तानात समावेश कसा होईल आणि पर्यायाने पाकिस्तानचा आकार मोठा कसा होईल ही होती. भारताच्या फाळणीचेदेखील असे अनेक अनर्थ होणार होते. ते मुस्लिम नेत्यांना समजावून सांगण्याचे आणि त्यांना एकत्र राहण्यास अनुकूल बनविण्याचे कार्य ब्रिटिशांनी केल्याचे दिसत

७०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान