पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील इतिहासाकडे मागे नजर लावली होती. पण मुसलमानांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आर्यसमाजाशी मिळताजुळता असला तरी हिंदू समाजाच्या स्वरूपाविषयी या दोन संघटनांत मतभेद होते. चातुर्वर्ण्य हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक श्री. गोळवलकर गुरुजी यांनी हिंदू धर्माचा पाया मानला होता. आंतरजातीय विवाहांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच उत्तेजन दिले नाही. गोळवलकर गुरुजी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने वेदकाळ आदर्श ठरतो. दुर्दैवाने हिंदूंच्या अध:पतनाचा जो काळ होता तोच हिंदूंचा आदर्श काळ समजून ते कवटाळून बसले-अजूनही बसलेले आहेत. मात्र मुस्लिम हे आक्रमक आहेत, परके आहेत, त्यांना घालवून दिले पाहिजे, त्यांचे आणि हिंदूंचे कधीच पटणार नाही ही गोळवलकरांची ठाम मते होती. आपल्या “We" पुस्तकात त्यांनी हिटलरने ज्यूंच्या केलेल्या ससेहोलपटीची स्तुती केली आहे. ते म्हणतात, "दोन सांस्कृतिक गटांचे पटत नसेल तर एकाने दुसऱ्याला घालवून देण्यात काहीच गैर नाही. भारताने आपल्यासमोर हे उदाहरण ठेवले पाहिजे."
 खाकसार आणि अहरार या मुस्लिम संघटना उघडउघड दंगलींना उत्तेजन देत आणि दंगली घडवून आणीत हे मागच्या विवेचनात आलेच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली क्वचितप्रसंगी घडवून आणीत असावा असे मानण्याइतका पुरावा उपलब्ध आहे. सांगलीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेले एक मित्र सांगतात..... “सांगलीतल्या किमान दोन दंगली संघवाल्यांनी घडवून आणल्या हे मला माहीत आहे.” (हे मित्र आपले अनुभव साहित्यरूपाने प्रकट करणार असल्यामुळे त्यांचे नाव जाहीर करणे मी इष्ट मानीत नाही.)
 श्री. सावरकर हे हिंदुत्ववाद्यांतील अग्रणी होते. त्यातल्या त्यात तुलनेने ते आपल्या विचारांना शास्त्रीय बैठक देत होते. त्यांना अस्पृश्यता अमान्य होती. चातुर्वर्ण्य मान्य नव्हते. खरे तर ते ईश्वराचे अस्तित्वही मान्य करीत नव्हते. विज्ञानाची कास धरण्यामुळेच समाजाची प्रगती होईल अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांना हिंदुधर्माचे राज्य अभिप्रेत नव्हते आणि तरीही भारत हे हिंदु राष्ट्र आहे ही घोषणा त्यांनीच केलेली आहे. सनातन्यांचे विरोधक सावरकर हे अशा त-हेने हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. या बाबतीत त्यांची तुलना जीनांशीच होऊ शकते.
 आता सावरकर ह्यात नाहीत आणि त्यांनी जोपासलेला हिंदमहासभा हा पक्ष जवळजवळ संपुष्टात आला आहे. परंतु महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजावर सावरकरांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव आहे आणि महाराष्ट्रात जनसंघाच्या मागे ब्राह्मण समाज एकमुखाने उभा राहण्याच्या मागे सावरकरांचा वैचारिक प्रभाव निश्चितपणे आहे.

 सावरकरांच्या विचारांची दिशा स्पष्टपणे समजावून घेणे येथे आवश्यक ठरेल. ह्यामुळे या देशाचा राष्ट्रवाद, सामाजिक उभारणी, शासकीय स्वरूप यांच्याविषयी हिंदुत्ववाद्यांच्या कल्पना प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या लक्षात येतील. या दृष्टीने सावरकरांनी १९३७ साली अहमदाबाद येथे हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण त्यांच्या विचारसरणीचा ठाव घेण्यास पुरेसे आहे. त्यावेळी मुस्लिम समाजाच्या मागण्या आपल्याला आपल्या संख्येपेक्षा

हिंदुत्ववाद/१७१