पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थितीत याचे उत्तर सापडेल. आपल्या विशिष्ट स्वभाववैशिष्ट्यांमुळे पंजाबात मुसलमान आणि शीख समाज ठसठशीतपणे उठून दिसत होते. पंजाबमधील हिंदू समाजात ह्या वैशिष्ट्यांची उणीव होती. त्याच्या ह्या मानसिक अवस्थेमध्ये आर्य समाजाच्या शिकवणीमुळे ही उणीव भरून निघेल असे त्याला वाटले आणि आपल्याला आपल्या अस्मितेची एक नवी खूण मिळाली या हिंदूंमध्ये निर्माण झालेल्या भावनेमुळे पंजाबमधील हिंदू समाजात आर्य समाजाने मूळ धरले.
 स्वामी दयानंद यांनी 'सत्यार्थप्रकाश' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ म्हणजे बायबल, कुराण इत्यादी इतर धर्मग्रंथांची निंदानालस्ती आहे. युक्तिवाद त्यात भरपूर आहे. धार्मिक आवाहन कमी आहे. स्वामीजींनी वेदकाळ हा हिंदूंचा आदर्श किंवा सुवर्णकाळ मानला आहे. त्यामुळे वेदकाळापर्यंत मागे जाणे अपरिहार्य ठरले. वेदकाळात जातिसंस्था नव्हत्या, मूर्तिपूजा नव्हती, यामुळे मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्था हटविण्याची मोहीम आर्यसमाजाने आरंभिली. एका परीने आर्य समाजाने हिंदू समाजात निश्चितपणे अंतर्गत सुधारणा घडवून आणल्या. परंतु खिलाफत चळवळीच्या काळात झालेल्या दंगली आणि स्वामी श्रद्धानंदांचा एका मुसलमानाने केलेला खून यामुळे आर्य समाजिस्ट कडवे मुस्लिमविरोधक बनले. असे म्हणता येईल की या दोन घटना घडल्या नसत्या तरी आर्य समाजिस्ट मुस्लिमविरोधी बनलेच असते. कारण गतेतिहासाच्याही मागे जाऊ पाहणाऱ्या ईयेचा, मागे जाण्याचा तो अनिवार्य परिपाक होता. आज आर्य समाजिस्ट फारसे प्रभावी राहिलेले नाहीत. पंजाबमध्ये फाळणी झाल्यानंतर परिस्थितीच बदलली आणिं शीख-हिंदू तणाव सुरू झाले. आर्य समाजिस्टांनी शीखविरोधाचे राजकारणही सतत केले आहे. यामुळे पंजाबी सुभ्याच्या मागणीच्या वेळी या मागणीला विरोध करणाऱ्यांत आर्य.समाजिस्ट आघाडीवर होते. बहुतेक आर्य समाजिस्ट आता जनसंघात गेले आहेत. काही काँग्रेसमध्येही आहेत. (१९७२ साली हरियाणाच्या आर्यसमाजिस्ट असलेल्या शिक्षणमंत्र्यांनी, मुलामुलींनी संयुक्त शिक्षण घेण्याच्या पद्धतीवर बंदी हुकूम घातला. काँग्रेसमधील हे आर्यसमाजिस्ट काँग्रेसच्या अधिकृत धोरणाविरूद्ध अधूनमधून अशाप्रकारे वागताना दिसतात.)

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केली. तेव्हा युरोपात फॅसिझमच्या उदयाचा काळ होता. इटलीत मुसोलिनीने सत्ता काबीज केली होती आणि जर्मनीत हिटलर· प्रबळ होत होता. या अतिरेकी राष्ट्रवादी चळवळींचा परिणाम म्हणजे धर्मवादावर आधारलेल्या स्वयंसेवक संघटना होत. हिंदूंत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने उभी राहिली: मुसलमानांत 'खाकसार' या नावाने उदयाला पावली. (डॉ. अल्लामा मश्रिकी हे खाकसार संघटनेने सूत्रधार होते. ते बर्लिन विद्यापीठाचे पदवीधर होते.) युरोपातील राष्ट्रीय चळवळीचे वेडेवाकडे परिणाम भारतातील धार्मिक चळवळीवर होणे स्वाभाविक होते. कारण येथे प्रादेशिक राष्ट्रभावना पुरेशी बळकट झालेली नव्हती. हिंदु-मुस्लिम तणाव होते आणि राष्ट्रवादाला धर्मवादाचे अधिष्ठान दिल्याखेरीज त्या संघटना वाढणे मुष्किलीचे होते. डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनाही या पायावर उभी राहिली आणि वाढली.

१७०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान