पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोगत 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जनजागरण कार्य' हे पुस्तक नाशिक आकाशवाणी केंद्राच्या प्रेरणेने सिद्ध झाले आहे. एक वेगळा संत निवडा आणि त्यावर व्याख्याने द्या असे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी मला सांगितले. त्यामुळे समर्थ रामदासस्वामी, वारकरी संतमेळा, संतांनी केलेले सामाजिक प्रबोधन हे नेहमीचे विषय बाजूला ठेवून मुद्दाम संत तुकडोजी महाराज व्याख्यान निमित्ताने अभ्यासाला निवडले. अवघ्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकलेला माणूस जपानला जाऊन येतो. त्याचे नाव नागपूर विद्यापीठाला दिले जाते ही अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. म्हणूनच या थोर महात्म्याने केलेले जनजागरण कार्य सर्वदूर घराघरात पोहचविणे आवश्यक आहे असे वाटले. त्यावर शोध घेतला असता शाळकरी पुस्तकांखेरीज फारशी चिंतनगर्भ सामग्री, लिखाण आढळले नाही म्हणून फक्त संत तुकडोजी महाराज यांच्याच लेखणीचा प्रमुख आधार घेतला. त्यात त्यांची ग्रामगीता, भजनावलीचे सर्व भाग अभ्यासले. त्यातून हे चिंतन साकार झालेले आहे. तेवढ्यासाठी विदर्भ परिसरातील 'मोझरी' गावालाही समक्ष भेट देता आली. तेथील संत तुकडोजी महाराजांचा महिमा आणि त्यांच्या महान कार्याची अनुभूती आली. तेव्हा हे आकाशवाणीच्या निमित्ताने झालेले लेखन प्रसिद्ध करणे गरजेचे वाटले. मी आकाशवाणी नाशिक केंद्राचा अंत:करणापासून ऋणी आहे. त्याचप्रमाणे बुकगंगा डॉटकॉम यांचा आणि अक्षरजुळणीसाठी स्मिताताई गुजर यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. मुद्रणाची जबाबदारी सुविधा प्रिंटर्सने उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समस्त अनुयायी चाहते आणि संतवाङ्मयाचे अभ्यासक, वाचक या छोटेखानी पुस्तिकेचे स्वागत करतील असा मला विश्वास आहे. - भास्कर गिरधारी