असे होतें कीं, दक्षिणेंत जो कंपनीचा व्यापार चालत होता तो निर्विघ्नपणें चालत नसे, तो चालावा. या दोन कारणाकरितां ही मंडळी रायगडीं आली. या मंडळींत मिस्तर हेनरी आकज्नन ह्मणून मुख्य साहेब होते. तेच पुढें सन १६७६ साली मुंबईचे डेपुटी गव्हरनर झाले. ही मंडळी मुंबईहून निघून चौल गावांवरून रोहें अष्टमीचे मार्गे रायगडाचे पायथ्या पाशीं ( पाचाडं ) नांवाचा कसबा जो त्यावेळीं व्यापार वगैरे संबंधानें चांगले स्थितींत होता, तेथें येऊन दाखल झाली. तेथील कारभारी नारायणजी पंडीत याजपाशीं आपला येण्याचा उद्देश निवेदन करून, नारायणजीस एक हिऱ्याची आंगठी, आपल्या कामास त्यांनीं मदत करावी ह्मणून नजर केली. यासमयीं शिवाजीमहाराज प्रतापगडावर महाराजांची सहाय्यकारी जी आदिमाता भवानीदेवी, जिच्यावर महाराजांचा पूर्ण विश्वास तिची सुवर्ण पुष्पांनीं पुजा करण्याकरितां गेले होते. यामुळें या मंडळीस रायगडावर जाण्याची परवानगी मिळाली नाहीं. सबब तेथेंच ह्मणजे चार पांच दिवस मुक्काम करून राहिली. पांचाडगांवीं महाराज परत रायगडीं दाखल झाल्यावर नारायणजी पंडीत यांस बरोबर घेऊन रायगडावर मंडळी गेली. तेथें राजवाडा आणि
- हल्ली पाचाड गांवीं पांचदहा मावळे लोकांची मात्र झोपडीं आहेत.