Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११)

निश्रय करून आपली दिल्लीशहरांतून सुटका करून घेतली. (याविषयींची सर्व हकीगत इतिहासांतून प्रसिद्ध आहे. म्हणून येथें लिहीत नाहीं.) असो, अशा प्रकारें मोठे करतबगारीनें आपली व पुत्राची सुटका करून घेऊन शहराबाहेर पडल्यावर साधूचा वेष महाराजांनी धारण केला. अंगावर भगवीं वस्त्रें परिधान करून दाढी मिशा काढून टाकल्या व "स्वदेशाभिमान" हाच एक ईश्वर त्याचें मनांत स्मरण करीत करीत उन्हाळा, पावसाळा, सर्व डोकीवर सहन केला. कोठें धर्मशाळेच्या कोंपऱ्यांत मुक्काम !तर कोठें झाडाखालीं धुळींत वस्ती! अशा स्थितींत अनेक कष्ट सोशीत रायगड सोडल्यापासून नऊ महिन्यांनीं, मार्गशीर्ष महिन्यांत रायगडीं येऊन महाराज दाखल झाले. आणि प्रथम मातोश्री जिजाबाई साहेब यांचे महालांत जाऊन त्यांच्या पायांवर साष्टांगनमस्कार घातला. यासमयीं ती वीरमाता आपल्या पुत्राचे सुटकेकरितां ईश्वराचे भजनांत अगदीं निमग्न झाली होती; याजमुळें जिजाबाईसाहेबानीं महाराजांस कांहीं ओळखिलें नाहीं. त्यांस चमत्कार वाटला कीं, हे साधु पुरुष एकदम आंत येऊन माझे पायांवर डोकी ठेविली. यांत आहे तरी काय? जिजाबाई ह्मणाल्या " हे साधुपुरुषा तुह्मास कांही धन दौलत पाहिजे असेल तर मागा मीं देईन. पण माझ्या पायात पडूं नका. यांत आह्मास दोष लागतो; कारण आह्मीं साधुचे चरणीं लागावें. त्याचे उलट आपण हें