होते आहे; या परिस्थितीत धान्योत्पादन वाढवणे हे मोठे आव्हान आहे. या बाबतीत शासनाने कितीही वल्गना केल्या तरी कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग, राष्ट्रीय अन्न महामंडळ, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या यांतील त्रुटी भरून काढून सर्व गरिबांना अन्न पुरविणे हे केवळ अशक्य आहे.
लालबहादूर शास्त्रींनी यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व भारताला घालून दिले होते. त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाचा जयजयकार केला नाही; तेही नेहरूंप्रमाणेच प्रौढ मताधिकार मानणारे होते, पण त्यांनी जवान आणि किसान यांचे देशरक्षण आणि देशपोषण यांकरिता महत्त्वाचे स्थान मान्य केले आणि म्हणून, त्यांचा जयजयकार केला.
गुंड आणि फंडवाले यांच्या तावडीतून देशाला सोडवायचे असेल तर लाल बहादूर शास्त्रींनी सुचवलेला मार्ग पुढे आणखी विकसित करणे शक्य आहे. मतदानाचा हक्क केवळ शेतकरी आणि सैनिक, तसेच किमान रोजगार निर्माण करणारे उद्योजक, तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ अशा पोशिंद्यांपुरताच मर्यादित ठेवला तर यासंबंधीच्या नियमांत काही बदल करावे लागतील हे खरे. उदाहरणार्थ, शेतकरी म्हणजे वारसा हक्काने किंवा अन्य काही मार्गाने जमिनीचा मालक झाला असेल तो शेतकरी, ही कल्पना सोडून द्यावी लागेल. शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला तो शेतकरी अशीही व्याख्या चालणार नाही. जो प्रत्यक्षात शेतीच्या आधारे पोट भरतो आणि आपला संसार चालवतो तो शेतकरी, अशी व्याख्या केल्यास फंडगुंडशाहीचे राजकारण संपवून अधिक जबाबदार व अधिक शिस्तीने चालणारे राजकारण अजूनही तयार करणे अशक्य नाही.
(दै. लोकसत्ता दि. ४ सप्टेंबर २०१३ )
■