समजतो, पण माझेही तुम्हाला वंदन आहे. ही चिठ्ठी अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत मी जपून ठेवली होती; आता ती कोठेतरी गहाळ झाली. त्यानंतर आणखी चार ठिकाणी शिबिरे झाली. स्त्रियांच्या प्रश्नांची मनात थोडी थोडी जुळणी होऊ लागली. स्त्री-प्रश्नावरील पुस्तकांचा आणि चळवळीचा अभ्यासही चालू होता.
योगायोगाने त्याच वेळी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे माझ्याकडे आंबेठाणच्या शेतावर भेटण्यास आले. त्यांनी संगमनेरच्या त्यांच्या महाविद्यालयात मी भाषण देण्याकरिता यावे अशी विनंती केली. त्याबरोबरच त्यांनी शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताशी सुसंगत स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी मी करावी अशीही इच्छा व्यक्त केली. रावसाहेब कसबे हे स्वतः अनेक सामाजिक प्रश्नांवरचे जाणते समीक्षक आहेत. त्यांनी दिलेले हे निमंत्रण मी आव्हान म्हणूनच स्वीकारले. कारण शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताबद्दल मला इतका आत्मविश्वास होता की, त्याच्याशी सुसंगत अशी स्त्री-प्रश्नांची मांडणी करता येईल याची मला आतून खात्री वाटत होती. शिवाय, चार-पाच शिबिरांत स्त्रियांनी आपल्या मनातील खळबळ ऐकवून बांधून दिलेली शिदोरीही हाती होती.
१९८६च्या फेब्रुवारी महिन्यात एक केवळ शेतकरी महिलांचे अधिवेशन भरवावयाचे ठरले होते. माझ्या दुर्दैवाने त्याच सुमारास म्हणजे १९८५च्या डिसेंबरमध्ये मला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलावे लागले. ती इष्टापत्तीही ठरली. त्यामुळे सगळा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पुन्हा सावचितपणे फिरून अधिक अभ्यास व अधिवेशनाचा प्रचार करण्याचे काम जमले.
या सर्व अभ्यासातून आणि आजारानंतरच्या विश्रांतीच्या काळातील चिंतनातून 'चांदवडची शिदोरी' या पुस्तिकेची निर्मिती झाली. 'चांदवडची शिदोरी'त दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. पहिला मुद्दा म्हणजे समाजवादी पद्धतीने मुलांसाठी पाळणाघर आणि सर्वांसाठी सामायिक रसोडे घालून स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही. स्त्रियांचा प्रश्न हा शेतीतील वरकड उत्पन्नाच्या लुटीतून सुरू झालेल्या रक्तबंबाळ युगातील एक अवशेष आहे. दुसरा मुद्दा असा की, अमेरिकन स्त्रीवाद्यांचे म्हणणे असे आहे की, पुरुष हा अधिक बलवान असल्यामुळे तो स्त्रियांवर सत्ता गाजवतो.' तसे म्हटले तर स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करू शकणाऱ्या पुरुषांची संख्या अत्यल्पच असते, पण अशा शक्यतेच्या भीतीने पुरुष स्त्रियांना घरात कोंडून ठेवत असावेत. पुढे माझा प्रतिवाद होता की, पुरुष हे अधिक