पान:रससूत्र (Rasasutra).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दिले आहे त्यात रस्यमान स्थायीला रस म्हटले आहे. खरोखरी शंकुकाला हे अभिप्रेत आहे का हा निराळाच प्रश्न आहे. पण चर्वणेचा विषय झालेला स्थायी आणि अनुमित स्थायी ह्या कल्पना अगदी भिन्न आहेत हे उघड आहे. आपणासमोर शंकुकाचे म्हणणे समजून घेण्यासाठी मुख्य आधार अभिनवगुप्तांचे अभिनव भारतातील स्पष्टीकरण हाच आहे. साहाय्यक आधार म्हणून लोचन, भट्ट तोताचे आक्षेप, महिम भट्ट ह्याचा विचार करता येईल.
 अभिनव भारतीत शंकुकाचे म्हणणे अशा प्रकारे स्पष्ट केलेले आहे. म्हणून विभाव म्हटलेले हेतू , अनुभाव म्हटलेले कार्य व व्यभिचारी म्हटलेले सहचारी ह्या लिंगांच्या योगाने, प्रतीयमान होणारा स्थायीभाव हाच रस आहे. हा स्थायीभाव मुख्य रामादिगत स्थायीचे अनुकरणरूप असतो. अनुकरणरूप असल्यामुळे त्याला रस हे वेगळे नाव दिलेले आहे. ह्यांपैकी विभाव काव्यचलाने अनुसंधेय आहेत, म्हणजे काव्यबलाने जाणले जातात. अनुभाव शिक्षणाच्या योगाने दाखविले जातात. व्यभिचारीभाव कृत्रिम असतात. पण ते स्वतःच्या अनुभवाच्या आधारे प्रयत्नपूर्वक साधले जातात. अभिमानाच्यामुळे अनेकांच्या ठिकाणी असणारे अनुभाव व व्यभिचारीभाव, अनुकर्त्यांचे म्हणून जाणले जात नाहीत. स्थायीभाव काव्यबलानेसुद्धा अनुसंधेय, म्हणजे जाणला जाणार नाही. ही अवगमनशक्ती वाचकत्त्वाहून भिन्न आहे. म्हणूनच रससूत्रात स्थायीभावांचा उल्लेख केलेला नाही. अशाप्रकारे शृंगार रतीचे अनुकरण असल्यामुळे त्याला तदात्मक, तत्प्रभव म्हणणे योग्यच आहे. हे मिथ्याज्ञान आहे असे जरी म्हटले तरी मिध्याज्ञान अर्थक्रियाकारी असते. पण ही प्रतीती मिथ्या नसून ती विलक्षण प्रतीती आहे.
 शंकुकाने हे जे विवेचन केले आहे त्यातील सर्वांत महत्त्वाची बाब ही आहे की, ह्या विवेचनात अनुमान हा शब्द कुठेही नाही. शंकुकाचे शब्द प्रतीयमान व अवगमन हे आहेत. तिसरा शब्द अभिनय असा आहे. जो शब्द शंकुकाने वापरलेलाच नाही, तो शब्द त्याच्यावर लादणे आणि त्याला अनुमितीवादी म्हणणे, न्याय्य होणार नाही. शंकुकाच्या भूमिकेची काही सामर्थ्यस्थाने आहेत. तीही नजरेआड करता येणार नाहीत. पहिली महत्त्वाची बाब ही की, तो प्रसिद्ध रससूत्रात स्थायीभावाचा उल्लेख का नाही असा प्रश्न उपस्थित करतो. हया प्रश्नाचे लोल्लटानुसारी उत्तर हे की, स्थायीभावच रस होत असल्यामुळे येथे त्याचा मुद्दाम उल्लेख करण्याची गरज नाही. लोल्लटाच्या हया उत्तराला नाट्यशास्त्रात पाठिंबा आहे. कारण स्थायीभावालाच रस हे नाव प्राप्त होते, असे नाट्यशास्त्राचे मत आहे. शंकुकाने स्थायीभावच रस होतो हवा भूमिकेला बाधा न आणता रससूत्रात स्थायीचा उल्लेख का नाही हया प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. त्याचे म्हणणे असे की, स्थायीभाव अभिनीत व्हायचे आहेत, त्याचे आगमन व्हायचे आहे. या अवगमनाची लिंग सामग्री फक्त रससूत्रात


४६