Jump to content

पान:रससूत्र (Rasasutra).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेट ज्या कण्वांच्या आश्रमात झाली त्या आश्रमाचे अनुकरण करणे भाग आहे. हे अनुकरण पडदे व देखाव्यांना करावे लागणार. हे अचेतन अनुकर्ते आहेत. कारण सारे नाट्यच अनुकरण आहे. नाट्य हे अनुकरण रूप असते हे लोल्लट, शंकुकाला अभिप्रेत आहे. ह्या अनुकर्ते व अनुकार्य विभागणीमुळे सा-या नाट्यप्रयोगाची विभागणीच दोन गटांत करणे तेथे अभिप्रेत आहे. ही विभागणी जशी लोल्लटाच्या विवेचनात निर्दोष आहे तशी नैय्यायिक शंकुकात निर्दोष नाही.
  लोल्लट समजून घेताना विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी, ही सामग्री अनुकार्याच्या अपेक्षेने एकदा समजून घेतली पाहिजे, नंतर अनुकर्त्याच्या अपेक्षेने समजून घेतली पाहिजे. अशा दोन गटांतून सामग्री विभागून घेऊन लोल्लटाचा विचार कधी झालाच नाही, ही दुर्दैवी घटना आहे. खरे म्हणजे नाट्यशास्त्राने हा विचार न करण्याची सोय ठेवलेली नाही. नाट्यशास्त्रात अभिनव आणि अनुभाव या कल्पना निराळ्या पातळीवरच्या आहेत आणि अभिनय ही कल्पना अतिशय व्यापक आहे. नाटयशास्त्रात वेळोवेळी अमुक अनुभावांचा अभिनय करावा अशा सूचना आहेत. पण अभिनय मात्र केवळ अनुभवांचा नाही. आशर्य अभिनय, वाचिक, सात्त्विक अभिनय असा अभिनयाचा व्याप मोठा आहे. कारण अभिनय विभावांचाही आहे.
 खरा प्रश्न हा आहे की, अनुभाव कुणाचे समजावे ? ज्याचे भाव त्याचे अनुभाव हे उघड आहे. ज्या सचेतन शरीराचा आश्रय भाव घेतील तिथे स्थायी, संचारी, चित्तात उपस्थित असणार आणि अनुभाव शरीरावर गोचर होणार. अशोक वनात सीता रामाची आठवण काढून शोक करत बसली आहे. या प्रसंगाची कल्पना आपण करू. ह्या ठिकाणी ज्या पडद्याच्या देखाव्याच्या द्वारे अशोकवन उभे केले आहे तो आशर्य अभिनय आहे. सीतेचे काम करणारी नटी हा काव्यगत प्रकृतीचा अभिनय आहे. सीता अनुकार्य आणि नटी अनुकर्ती. या नटीच्या डोळ्यांत उभे राहणारे अश्र हा अनुभावांचा अभिनय आहे. या ठिकाणी शोकाचीही उत्पत्ती नाही. हाच प्रसंग, सीता स्वयंवराचा असेल तर रतीचीही उत्पत्ती नाही. ज्या वेळी नाट्य प्रयोगात अशोकवनातील सीतेचा प्रसंग अभिनत होतो, त्यावेळी नटी अभिनय करीत आहे असे आपण म्हणू. सीतेच्या बाबतीत काय म्हणावे ? सीता ही शोकाचा अभिनय करीत आहे असे म्हणता येणार नाही. लोल्लटाच्या भूमिकेचे खंडन करताना, नेहमी भर दिला जातो तो ह्या मुद्दयावर, की नाटयात नटाच्या ठिकाणी भावनांची उत्पत्ती संभवत नाही. नटाच्या ठिकाणी भावनांची उत्पत्ती संभवत नाही हे खरेच आहे, पण लोल्लटाच्या खंडनात हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण नाही. तो सुद्धा नटाच्या ठिकाणी भावनांची उत्पत्ती मानत नाही. जर नटाच्या ठिकाणी भावनांची उत्पत्ती मानली, तर नाटय अनुकरणरूप आहे हा मुद्दा व्यर्थ आहे.
 संस्कृत काव्य विवेचक ( मीमांसक) नाटय अनुकरणरूप नाही, म्हणून तिथे


32