पान:रससूत्र (Rasasutra).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भावनांची उत्पत्ती नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करतात. अनुकरणरूप नसणाऱ्या नाटयात भावोत्पत्ती असणार नाही, हा पक्षही संभवनीय आहे, भावोत्पत्ती असेल हा पक्षही संभवनीय आहे पण नाटय अनुकरणरूप मानल्यानंतर भावोत्पत्ती अशक्यच आहे. अनुकरणरूप नाटयात आलंबन विभाव नसून त्याचे अनुकरण असते, उद्दीपन विभाव नसून त्याचे अनुकरण असते, अनुभाव नसून त्याचे अनुकरण, म्हणजे अभिनय असतो. उघडच आहे की ह्या ठिकाणी स्थायी व्यभिचारी- नसून त्यांचेही अनुकरण आहे. तेव्हा लोल्लटाला नटाच्या ठिकाणी भावोत्पत्ती मानता येत नाही. ती त्याने मानलेली नाही हे उघड आहे. ज्या तीन कारणांमुळे विपर्यास झाला आहे, ती ठिकाणे नीट समजून घेऊन हा विपर्यास निरस्त करणे भाग आहे. अभिनवगुप्तोत्तर अभ्यासक, विभाव फक्त नाटयातच आहेत असे मानतात. या भूमिकेचा उदय, शंकुक आहे. विभाव नाट्यात आहेत, ते नाटयधर्मी व कृत्रिम आहेत. विभाव अलौकिक आहेत, ही भूमिका स्वीकारल्यानंतर ते भावाच्या उत्पत्तीचे, निर्मितीचे कारण होऊ शकत नाहीत. पण लोल्लट विभाव भावांचे उत्पत्ती कारण मानतो. परिणामी पहिल्या आक्षेपाचा जन्म होतो. विभाव हे लौकिक पदार्थासारखे कारण नाहीत. ते नाटयधर्मी आहेत, ते भावांच्या उत्पत्तीचे कारण कसे होणार? एका विपर्यासाचा निरास हा आहे की, लोल्लट नाट्यप्रयोगात विभाव असतात असे मानत नाही. तो प्रयोगात विभावांचे अनुकरण मानतो. अनुकरणरूप विभाव, अनुकरणरूप भावाच्या उत्पत्तीचे कारण मानत नाही. तो विभाव, भावांच्या उत्पत्तीचे कारण मानतो व म्हणून विभावांचे अनुकरण करताना, भावानुकरण होते असे मानतो.
 विपर्यासाचे दुसरे कारण लोलटकृत उद्भट खंडन आहे. ह्या खंडनात लोलट सांगतो 'नटाच्या ठिकाणी रसभाव अनुसंधान बलाने संभवतात. आता जर लोल्लटच नटाच्या ठिकाणी रसोत्पत्ती सांगू लागला, तर त्याचे हे मत आहे असे सर्वजण मानणारच. ह्या ठिकाणच्या संदर्भातच विपर्यासाचा निरास आहे. संदर्भ असा आहे उद्भट म्हणतो नटाच्या ठिकाणी रसभाव नाहीत. कारण जर रसभाव नटाच्या ठिकाणी मानले तर मरणादींचे काय ? नटही मरतो असे समजावे लागेल, नटाला मरावे लागेल; शोक, क्रोधादी भावनांचा आवेग वाढल्यानंतर, नट लय कशी सांभाळू शकणार ? हा लयीचा मुद्दा नृत्याभिनयामुळे आहे. प्राचीन नाटक नृत्याभिनीत असल्यामुळे अभिनय एका ताललयीत, ताललय सांभाळीत साकार होत असे. खरोखरी शोक, क्रोध नटाच्या ठिकाणी उत्पन्न झाला तर लय भंग होणे, पाठ्याचा सांधा तुटणे भाग आहे. म्हणून उद्भट म्हणतो, प्रेक्षकांना जो नटाच्या ठिकाणी भावांचा प्रत्यय येतो, तो भ्रम आहे नटाच्या ठिकाणी रसभाव नसतात. काही आधुनिक विवेचक लोल्लटाला अडाणी व स्थूल बुद्धीचा समजतात. ते म्हणतात, रसविवेचन सुरू झाले की प्राथमिक अवस्थेत पहिला पक्ष हाच निर्माण होणार, नट रडतो, नट नाचतो


३३