पान:रससूत्र (Rasasutra).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पांडे आणि इटालियन संशोधक नोली ह्यांच्या मते हा काल इ. स. ८५९ ते इ.स. ८९० म्हणजे नवव्या शतकाच्या उत्तरार्धात आहे. लोल्लटाचा काळ पुढे ढकलण्याने कारण तो स्पंदकारिकेवरील वृत्तीकार समजणे हे आहे. त्याला शैवअद्वैती समजण्याने कोणतेही कारण नाही. सर्वोचेेेच कालनिर्णय अंदाजे आहेत. मला लोलटाचा काळ आठव्या शतकात कुठेतरी येतो असे वाटते. लोलटाच्या ग्रंथाचे रविवरण असे उपलब्ध होते. अभिनवगुप्ताच्या आधीच्या कुणाही नाटयशास्त्रभाष्यकारांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. लोल्लटाचा देखील नाही. भट्ट लोल्लट हा नाट्यशास्त्राचा पहिला टीकाकार नव्हे. ह्याच्या पूर्वीचे किमान चार टीकाकार, राहुल, कीर्तिधर, मातृगुप्त आणि उद्भट हे निदान नावाने उपलब्ध आहेत. एकतर संगीत रत्नाकर कारांनी लोल्लटासह उद्भट व कीर्तिधर ह्यांचा भरताचे व्याख्याकार म्हणून उल्लेख केला आहे. (१/१७/१९) दुसरे म्हणजे अभिनव गुप्तांनी त्यांच्या मतांचा उल्लेख केला आहे. तिसरे म्हणजे अभिनवोत्तर टीकाकारांनी त्यांची मते वेळोवेळी उद्धृत केलेली आहेत. तेव्हा हे ज्ञात टीकाकार आपणास गृहीत धरणे भाग आहे. पण रससूत्रावरील व्याख्यानात अभिनव गुप्तांनी ह्या टीकाकारांच्या मताचा उल्लेख केलेला नाही. हे टीकाकार नाटयशास्त्राची व्याख्या करीत. असल्यामुळे त्यांना 'रस' ही कल्पना विचारात घेणे भागच होते, नाटयात काय, किंवा काव्यात काय, 'रस' असतो हे सर्वमान्यच होते. काव्यात, नाटकात रस नसतो असे भारतीय परंपरेत कधीही कुणी म्हटल्याचे दिसत नाही. प्रश्न ह्या कल्पनेचे महत्त्व किती हा आहे. लोल्लटापूर्वीच्या टीकाकारांनी 'रस' ही कल्पना मान्य असली तरी तिला महत्त्व देऊन विचार केला पाहिजे, असे त्यांना वाटलेले दिसत नाही. रसाच्या कल्पनेला मध्यवर्ती महत्त्व देऊन नाटयशास्त्राचा विचार करणारा पहिला महत्त्वाचा भाष्यकार लोल्लट दिसतो.
 अभिनव भारतीत मातृगुप्ताचार्यांचा उल्लेख अ. २९ मध्ये, वीगेवर निर्माण करावयाच्या स्वरांच्या संदभात, आला आहे. पण राबवभट्टासारखा टीकाकार मातृगुप्ताचे रसविषयक मत सुद्धा, उल्लेखितो. मातृगुप्त सर्वन रस वाक-अंग-नेपथ्य असे त्रिविध मानत असत. ही भूमिका नाट्यशास्त्रातच आलेली आहे. शृंगार, हास्य आणि रौद्र ह्या तीन रसांच्या संदभीत ही भूमिका नाट्यशास्त्रातच आहे, म्हणजे असे मानणान्यांची परंपरा नाट्यशास्त्र संग्रहाला प्राचीन आहे. अभिनवगुप्तांनी त्यांच्या समोर असणाऱ्या रसविषयक नानाविध मतांचा उल्लेख लोचनात एके ठिकाणी केला आहे. त्यावरून मोजदाद करायची, तर रसविषयक वारा पक्ष अभिनवगुप्तांच्या समोर आहेत. त्यापैकी अनुभाव म्हणजे रस मानणारी भूमिका मातृगुप्तांची आहे. ह्याच भूमिकेचा पर्याय आभििनय म्हणजे रस हा आहे. ही भूमिकासुद्धा बीजरूपाने नाट्य शास्त्रात आहे. दीर्घकाळपर्येंत प्रचलित असणारी, नाट्यशास्त्रात आधार असलेली ही भूमिका खंडन करण्याइतकी सुद्धा अभिनवगुप्त महत्त्वाची समजत नाही.आपल्या

१०