पान:रससूत्र (Rasasutra).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळी आलंबन विभाव, उद्दीपन विभाव आणि अनुभाव ह्या तिन्हीशी संलग्न होणा असतील तर मग विभाव आणि अनुभाव यांतील फरक कोणता ? हाही वादविषय आहे. विभाव, अनुभाव, लोकधर्मी की नाट्यधर्मी की दोन्ही प्रकारचे ? संचारी भाव यांची संख्या निश्चित आहे काय ? त्यांचे स्वरूप कोणते ? यांचा स्थायी भावाशी संबंध काय ? अनुभाव भावांचे की फक्त संचारी भावांचे ? असा ही वाद आहे. संयोग म्हणजे काय ? निष्पत्ती हणजे काय ? रस म्हणजे काय ? हे तर वाद विषय आहेतच. म्हणजे सूत्रातील सात शब्द विवाध्य आहेत. पण याखेरीज दोन प्रश्न आहेंंत. प्रथम म्हणजे या सूत्रात सात्विक भावांचा उल्लेख नाही. ते अनुभावात गृहीत समजावे की व्यभिचारी भावात गृहीत धरावे ? किंवा सूत्रात जे उल्लेखिलेले नाही ते प्रेक्षकगत समजून सात्त्विकभाव प्रेक्षकांचे मानावेत असा एक प्रश्न आहे. स्पष्टपणे ह्या प्रश्नाची चर्चा न करता संस्कृत साहित्य शास्त्र सात्त्विकभाव अनुभावाच्या मध्ये आले असे गृहीत धरते. दुसरा प्रश्न असा आहे की या सूत्रात स्थायी भावांचा उल्लेख का नाही ? एक प्रश्न असा आहे की नाट्यात अनुकरण शब्दाचा अर्थ काय आहे ? हा प्रश्न विभावांचे स्वरूप सांगताना चर्चिला जातो. सात शब्दांच्यामुळे निर्माण झालेल्या प्रमुख नऊ प्रश्नांची विविध प्रकारची चर्चा म्हणजे रसचर्चा. ह्या रसचर्चेला अभिनव गुप्तांनी लोलटापासून आरंभ केलेला आहे.
 रसांची कल्पना नाटयशास्त्र संग्रहापेक्षा किमान दोन हजार वर्षे जुनी आहे. ती वेदसंहितांच्यामध्येच ग्रथित झालेली, अशी आपणास दिसते. पण त्या जुन्या काळी ह्या कल्पनेचा पद्धतशीरपणे कुणी विचारही केलेला नव्हता. कला-विचारात या कल्पनेचे स्थानही निश्चित झालेले नव्हते. इसवी सनाच्या पूर्वी एक-दोन शतके या कल्पनेचा तपशिलाने विचार सुरू झाला आणि इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्येंत विचारांचा एक टप्पा पूर्ण झाला. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात कालिदासाच्या निश्चितपणे पूर्वी, अश्वघोषाच्या निश्चितपणे नंतर, ह्या अवस्थेत रसकल्पनेचा जो विचार झालेला होता तो नाट्यशास्त्रात संग्रहित झालेला आहे. ह्या टप्प्याचा सविस्तर विचार आपण सर्वोत शेवटी करू. लोल्लटाचा नक्की काळ कोणता हे आपणाला माहीत नाही. उदभटाच्यानंतर आणि शंकुुकाच्या पूर्वी केव्हातरी तो होऊन गेला इतकेच आपण म्हणू शकतो. प्रत्येकाने आपल्या सोईनुसार लोल्लटाचा काल ठरविला आहे. भामहाचा टीकाकार उद्भट, त्यानंतर लोल्लट ह्या क्रमात प्रत्येकाच्या मधील अंतर थोडे कमी गृहीत धरले तर लोल्लट इसवी सनाच्या आठव्या शतकात केव्हातरी होऊन गेला असे म्हणण्यास अडचण पडत नाही. डॉ. के. ना. वाटवे हा काल प्रमाण मानतात. डॉ. ग. त्र्यं. देशपांडे ह्या काळाचा उल्लेख करतात. म. म. काणे यांनी एके ठिकाणी त्याचा काल इसवी सनाच्या आठव्या शतकाचा उत्तरार्ध ठरविला आहे (पृ. ४५) इतरत्र ते लोलटाचा काळ इ. स. ८०० ते इ.स. ८४० असा. मानतात. डॉ. कांतिचंद्र