पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "जे तुझ्या आश्रयाने सद्गुण झाले, त्या गुणांचे कौतुक कशाला? सर्वांचे डोळे दिपवणारे यौवन मात्र स्थिर असो.” चला, ती गेली. आपणही जावे. (परिक्रमा)
 मागेमागे येणाऱ्या सेविकांची पर्वा न करता वाघापासून दूर पळणाऱ्या हरिणीप्रमाणे चंचल झालेली ही कोण? अरे, ही तर विष्णुदत्तेची मुलगी माधवसेना. मातेच्या द्रव्यलोभामुळे नावडत्याशी पहूड स्वीकारावा लागतो, ते दुःख दिसतेच आहे.
 मुख म्लान आहे पण क्लान्त नाही. वेणीही विस्कटलेली नाही. केसात माळलेली फुले गळलेली नाहीत. स्तनचंदन तसेच आहे, ओठांवर चावे नाहीत. मेखला सुरचित आहे. असंगाचा संग झाल्यामुळे गेलेली त्रस्त रात्र दिसतेच आहे. ही मला न पाहताच जाणार काय?
 पण नाही. परतली. काय म्हणतेस? तू मला पाहिले नाहीस? तुझा दोष नाही बाळ. माणूस दुःखाने घाबरला की बुद्धीही बावचळून जाते. माझा आशीर्वाद
  "तुझे इष्टजन १७ धनवान असोत. नावडते दरिद्री असोत. मातेच्या लोभीपणामुळे नावडत्याचा सहवास तुला भाग न पडो."
 कुठून येत आहेस पोरी? काय म्हणतेस, सार्थवाह धनदत्तपुत्र समुद्रदत्ताकडून? वा ! ! आनंद आहे. तो तर आजचा कुबेर आहे. दीर्घ उसासे काय सोडतेस, ओठ काय चावतेस, तोंड काय वेळावतेस? तर मग माझा अंदाजच खरा ठरला.
 कसा म्हणतेस? पोरी, सारी रात्र तू दुःखाच्या शेजेवर, नाटकी रतीत संपविलीस? रात्रभर उजाडण्याची वाट पाहिलीस? भावहीन क्रीडेची रात्र. बोलण्याची मिठास नाही. ओठांना उत्सुक आमंत्रण नाही. विनोद १८ नाही. उसासे व जांभयांखेरीज खरे काहीच नाही. मिठीही कातर निसटती आणि अनुराग तर पुसटही नाही. हे सारे उघडच दिसत नाही का?
.  वाईट नको वाटू देऊस. रूपाचे काय घेऊन बसलीस? आपण दिसलेल्या रूपाचे कौतुक करावे हेच शास्त्र आहे. काय म्हणतेस? माझेही विचार काकूसारखेच आहेत? अग, तसे नाही. हे सांगण्याचे कारण आहे. आता तू जा. मी तुझ्या घरी येईन, तेव्हा शास्त्र नीट समजावून देईन. अरे, प्रणाम न करता गेली.

२४२ / रंगविमर्श