पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गणिका आणि गिऱ्हाइके यांचा मध्यस्थ असतो. वृत्तीने रंगेल, धन गमावलेला,, वृद्धपणाच्या सीमेवर असणारा आणि सर्वांच्या ओळखी असणारा असा हा विट असतो. तो चतुर, केसांना कलप लावणारा, आकर्षक कपडे घालणारा, उत्तान - शृंगारिक संभाषण करणारा व जोड्या जुळविण्यावर जगणारा असतो. त्याला आणखी एक नाव धूर्ताचार्य असे आहे. हा विट भाणामधील एकमेव पात्र असल्यामुळे भाणाचा रस शृंगार असणार हे उघड आहे. फक्त नाट्यशास्त्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही. भाणाच्या या स्वरूपात पुढेही फारसा बदल झालेला दिसत नाही. मात्र नाट्यशास्त्रानुसार भाणाचे कथानक दोन प्रकारचे असते. विट स्वतःच्या जीवनाची हकीकत सांगतो अशा प्रकारचे किंवा तो नायकाच्या जीवनाची हकीकत सांगतो अशा प्रकारचे.
 नाट्यशास्त्रानंतर दीर्घकाळपर्यंत नाट्यविचारांचे ग्रंथ सापडत नाहीत. ते आज लुप्त आहेत. दहाव्या शतकातील धनंजयाने भाणांची प्रधानवृत्ती भारती असते, तो एकपात्री प्रयोग असतो इत्यादी उल्लेखांसह भाणामध्ये शृंगार आणि वीर हे प्रधान रस असतात असाही उल्लेख केलेला आहे. संस्कृत नाटकांमधून विटांचे जे उल्लेख आढळतात, त्यांत विट मारामारी आणि गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असल्याचा उल्लेखसुद्धा आहे. भासाच्या 'चारुदत्ता'त शकाराबरोबर असणारा विट वसंतसेनेला भर रस्त्यावरून पळविण्याच्याच प्रयत्नात आहे. पुढे शूद्रकाने 'मृच्छकटिका'त या प्रसंगाला वेगळी डूब दिलेली आहे. विटाचा गुंडगिरीतील सहभाग लक्षात घेता त्याच्या कथानकात वीररसालाही अवकाश आहे, असे मान्य करावे लागते; पण हा वीररस शृंगाराच्या सोबतीला म्हणून असतो. यानंतर अकराव्या शतकात अभिनवगुप्तांनी भाणामध्ये करुण व अद्भुत हेही रस असतात, असे म्हटले आहे. संस्कृतातील अद्भुताची कल्पना पुष्कळच शिथिल अशी आहे. अनपेक्षितरीत्या सुखी शेवट झाला तरीही संस्कृत काव्यशास्त्रानुसार विस्मय आला की तिथे अद्भुत रस येऊ शकतो. याबरोबरच नायक अगर नायिकेचे विरहवर्णन म्हटले की करुण रसाला त्यात अवकाश मिळतोच. यानंतरच्या काळात विश्वनाथाने भाणात कैशिकी वृत्ती असू शकते असे म्हटलेले आहे.

 यावरून आपण जर असा अंदाज करू लागलो की, भाणाची रूपे त्या त्या कालखंडात क्रमाने बदलत होती, तर ते अनुमान चुकीचे ठरणार आहे. भाणाचे

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २३५